आखरी रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात यावे ! – आखरी रस्ता कृती समितीचे आयुक्तांना निवेदन 

अशा मागण्या का कराव्या लागतात ? रस्त्यांची कामे चांगली करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य प्रशासन स्वतःहूनच पूर्ण का करत नाही ? 

प्रतीकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – गंगावेस शिवाजी पूल या आखरी रस्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आखरी रस्ता कृती समितीच्या वतीने गेले दीड वर्ष आंदोलन चालू आहे. भुयारी गटार, पाणीपुरवठा वाहिनी दुरुस्ती यानंतर डांबरीकरणाची मागणी करण्यात आली. आता डांबरीकरण करण्यात येत असून हे डांबरीकरण चांगल्या दर्जाचे नाही. त्यामुळे आखरी रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आखरी रस्ता कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री सनी अतिग्रे, सुरेश कदम, युवराज जाधव, महेश कामत उपस्थित होते.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. यापुढील काळात शुक्रवार गेट ते पंचगंगा रुग्णालय या मार्गावरील रस्ता करतांना पाणीपुरवठा वाहिनीची गळती काढून नंतर रस्ता करावा.

२. सदर मार्गावर झालेल्या वाहिनी खोदकामामुळे झालेला धुळीचा त्रास दूर करावा.

३. पंचगंगा रुग्णालय ते पंचगंगा नदी या रस्त्याचे काँक्रेटीकरण करण्यात यावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याचा त्वरित पाठपुरावा करावा. तोपर्यंत सदर रस्त्याची दुरुस्ती करावी.

४. रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणारे कर्मचारी-अधिकारी यांच्यावर आयुक्तांनी कडक कारवाई करावी.