केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय घेण्यात येणार आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला होत असलेल्या विरोधाविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला काही घटक आणि विरोधी पक्ष यांचा तीव्र विरोध आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरण हे कोळसा कर्नाटक येथील प्रकल्पांना पुरवण्यासाठी केले जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘केंद्रीय जलवाहतूक मंत्री मनसुख मांडाविया हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गोवा भेटीवर येणार आहेत आणि त्यांच्या या भेटीच्या वेळी मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथे कोळसा हाताळणीमध्ये घट करण्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.’’

कोळसा आणि रेल्वेमार्ग दुपदरीकरण यांच्या विरोधात दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयावर मोर्चा

मडगाव – कोळसा आणि रेल्वेमार्ग दुपदरीकरण यांना विरोध करणार्‍या आंदोलनकर्त्यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी दक्षिण गोवा मुख्यालयावर मोर्चा काढून निवडक आंदोलनकर्त्यांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा चांदोर येथे आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलनकर्त्यांवर गुन्हे प्रविष्ट करावेत, अशी मागणी केली. आंदोलकांना धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक पडुवळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयावरील मोर्च्यामध्ये ‘गोयांत कोळसो नाका’ या संघटनेचा प्रमुख सहभाग होता. आंदोलनात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.

कोळसा हाताळणारी आस्थापने आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

‘गोयांत कोळसो नाका’ या संघटनेने या वेळी गोव्यात कोळसा हाताळणारी ‘जे.एस्.डब्ल्यू.’, अदानी, वेदांता आदी आस्थापने, तसेच मुरगाव पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल आणि भारतीय रेल्वेचे अधिकारी यांच्या विरोधात पर्यावरण नष्ट करून गोमंतकियांचे जीवन धोक्यात टाकल्याच्या आरोपावरून दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

 भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी पद आणि आमदारकी यांचा त्याग करून दाखवावा ! – विजय सरदेसाई, ‘गोवा फॉरवर्ड’

भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी पद आणि आमदारकी यांचा त्याग करून त्यांचा कोळसाविरोधी आंदोलनाला पाठिंबा आहे, हे सिद्ध करावे, असे आवाहन ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे. ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर आमदार सरदेसाई पत्रकारांशी बोलत होते. भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी रेल्वेमार्ग दुपदरीकरणाच्या विरोधातील आंदोलनात नुकताच सहभाग घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर आमदार सरदेसाई यांनी हे आवाहन केले.