पुणे – दिवाळीच्या कालावधीत रस्त्यांवर झालेल्या गर्दीमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच तज्ञांकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे पुढील ८ ते १० दिवसांमध्ये परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी दिली. महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगांवकर यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. दिवाळीनिमित्त आपल्याकडे कारवाई वेगात झाली नाही, मात्र आता कारवाई तीव्र केली जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही, हे मनातून काढून टाकले पाहिजे. त्यामुळे नियमांचे पालन करून वैयक्तिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांशी चर्चा करण्यात येत आहे, असे पवार यांनी सांगितले.