कॅसिनो धक्क्याजवळ बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांच्या विरोधात पणजी महानगरपालिकेची कारवाई चालूच

पणजी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – पणजी महानगरपालिकेने येथील विशेषत: कॅसिनो धक्क्याजवळ बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांच्या विरोधातील कारवाईची मोहीम चालूच ठेवली आहे.

पणजी महानगरपालिकेने कारवाई करतांना ‘पार्किंग निषिद्ध’ असलेल्या विभागात उभी केलेली अनेक दुचाकी वाहने कह्यात घेतली आहेत, तसेच चारचाकी वाहनांना ‘क्लॅम्प’ लावण्यात आले आहेत. कॅसिनो धक्क्याजवळ विशेषत: सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते आणि यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे.

निपाणी पालिका मंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनावर कारवाई

पणजी महानगरपालिकेने १९ नोव्हेंबर या दिवशी रात्री कॅसिनो धक्क्याजवळ बेशिस्तपणे पार्क केलेल्या निपाणी पालिका मंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनावरही कारवाई केली.