सर्वंकष कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार ! 

दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झालेले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल (उजवीकडे) आणि शेजारी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील

कोल्हापूर, २० नोव्हेंबर – स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांना १९ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक शौचालयदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सरपंच संवाद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी हा पुरस्कार घोषित करण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी, तर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याशी संवाद साधला. नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आनंद व्यक्त करत संबधित जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, अधिकारी आणि सर्व यंत्रणा यांनी केलेल्या श्रमाची ही फलश्रुती असल्याचे मत व्यक्त केले.