पणजी येथे रस्त्यावर नरकासुर प्रतिमादहन केल्याने खिळे लागून वाहनांचे ‘टायर पंक्चर’ झाल्याच्या घटना

स्थानिक पुरोहिताने समाजसेवा या नात्याने खिळे एकत्र करून ते कचरापेटीत फेकले !

पणजी महानगरपालिका रस्त्यावर होणारे नरकानुसर प्रतिमादहन रोखू शकली नाही आणि स्थानिक पुरोहिताला जमले, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पणजी महापालिकेला जमले नाही. या दोन्ही गोष्टी महापालिकेला लज्जास्पद !

पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – येथे दीपावलीच्या पूर्वसंध्येला रात्री नरकासुर प्रतिमांचे दहन रस्त्यावर केल्याने प्रतिमा सिद्ध करण्यासाठी वापरलेले खिळे रस्त्यावर सर्वत्र विखुरलेले होते. यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांच्या चाकांत खिळे घुसून हवा जात असल्याचे लक्षात आल्यावर एका स्थानिक पुरोहिताने समाजसेवा या नात्याने प्रतिमादहन केलेल्या ठिकाणचे रस्त्यावरील सर्व खिळे एकत्र करून ते कचरापेटीत फेकले. ‘नरकासुर प्रतिमा सिद्ध करणार्‍यांनीच एक गट करून हे खिळे दुसर्‍या दिवशी एकत्र करावे’, असे आवाहनही या स्थानिक पुरोहिताने केले आहे. (नरकासुर प्रतिमा सिद्ध करणार्‍यांमध्ये अशा प्रकारे दुसर्‍या दिवशी खिळे एकत्र करण्याएवढी नम्रता कुठून येणार ? नरकासुर प्रतिमा बनवल्याने नरकासुरासारखेच संस्कार होतात. जो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असेल त्याची शक्ती तेथे येते, असा नियम आहे. – संपादक)

नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या निमित्ताने दीपावलीच्या पूर्वसंध्येला पणजी परिसरात मोठमोठ्या नरकासुर प्रतिमा सिद्ध करण्यात आल्या आणि त्या रात्री सर्वत्र फिरवून त्याचे दहन करण्यात आले. प्रतिमादहन करण्यात आल्यानंतर प्रतिमा सिद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेले खिळे रस्त्यावर पडलेले होते. दीपावलीच्या दिवशी या रस्त्यावरून जाणार्‍या काही वाहनांच्या टायरना खिळे लागल्याने टायरमधील हवा गेल्याच्या घटना घडल्या. ही गोष्ट लक्षात आल्यावर पणजी परिसरातील एका स्थानिक पुरोहिताने प्रतिमादहन केलेल्या जागेवरील सर्व खिळे एकत्र केले. त्या वेळी सुमारे ३० त ४० खिळे सापडलेे. रस्त्यावर एकही खिळा रहाणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. याविषयी बोलतांना स्थानिक पुरोहित म्हणाले, ‘‘नरकासुर प्रतिमा बनवणार्‍या युवकांनी दुसर्‍या दिवशी महानगरपालिका किंवा शासन यांच्यावर विसंबून न रहाता एकत्र येऊन हे खिळे काढले पाहिजेत.’’