ऑनलाईन लॉटरी लागल्याचे, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पारितोषिक मिळाल्याचे संदेश, बँक व्यवहारासाठी ‘एटीएमचा पिन’ आणि आधारकार्ड क्रमांक विचारणे यांसारख्या विविध भूलथापांना बळी पडू नका, तसेच अशा संदेशांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !
साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
समाजात झटपट, विनासायास पैसा मिळावा या लोभापोटी नागरिक अनेक आमिषांना बळी पडून फसवणूक होण्याचे प्रसंग घडत असल्याचे लक्षात येते. सध्या कोरोना महामारीमुळे अनेक आस्थापने बंद पडून सर्वत्र निरुद्योग (बेरोजगार) वाढला आहे. या परिस्थितीचा अपलाभ घेऊन काही व्यक्ती सहस्रावधी-लक्षावधी रुपयांची लॉटरी लागल्याचे अथवा किमती वस्तूंचे पारितोषिक मिळाल्याचे संदेश, ऑडिओ मेसेज, लिंक सर्वत्र प्रसारित करत आहेत. यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्रविष्ट होत आहेत.
१. नागरिकांची दिशाभूल करणारे ऑनलाईन लॉटरी लागल्याचे, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पारितोषिक मिळाल्याचे संदेश, ऑडिओ मेसेज प्रसारमाध्यमांत प्रसारित होत असणे
सध्या सामाजिक माध्यमांवरून ऑनलाईन लॉटरी लागल्याचे, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पारितोषिक मिळाल्याचे संदेश, ऑडिओ मेसेज प्रसारित करण्यात येत आहेत. यानुसार काही लक्ष रुपयांचे अथवा ‘बीएम्डब्ल्यू’ सारख्या अलिशान गाडीचे पारितोषिक मिळाल्याचे सांगून नागरिकांना भुरळ घातली जाते.
२. लॉटरी किंवा गाडी यांचे हे पारितोषिक मिळवण्यासाठी लक्षावधी रुपये भरण्यासाठी पाठपुरावा करणे
त्यानंतर नागरिकांना लॉटरी अथवा गाडी यांचे हे पारितोषिक मिळावे म्हणून ‘प्रोसेस फी’, चलन विनिमय करण्यासाठी काही लक्ष रुपये भरण्यास सांगितले जाते. याकरता नागरिकांना त्यांचे आधारकार्ड क्रमांक, फोटो, अधिकोष (बँक) खाते आदी तपशील विचारला जातो. त्यानंतर भ्रमणभाषवर काही बँक खात्यांचा तपशील पाठवून त्यामध्ये वरील कारणांसह विविध क्लृप्त्या करून रक्कम भरण्यास गळ घातली जाते, त्याचा पाठपुरावा केला जातो. ही रक्कम शक्यतो एका टप्प्यात न मागता पारितोषिक मिळालेला ‘ग्राहक’ कसा प्रतिसाद देत आहे, यानुसार नवनवीन खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सांगितले जाते. अशी अनेक प्रकरणे घडल्याचे लक्षात येते. नुकतेच एका नागरिकास ‘कौन बनेगा करोडपती’चे पारितोषिक मिळाल्याचे सांगून अशा प्रकारे फसवणूक करून बँकेच्या विविध नऊ खात्यांमध्ये १७ लाखांहून अधिक रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले.
३. अशा फसवणुकीविरूद्ध पोलिसांकडे तक्रार करूनही गमावलेली रक्कम परत मिळण्याची शाश्वती नसणे !
विनासायास पैसे मिळवणे, किमती वस्तूंच्या पारितोषिकास भुलून पैसे भरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नागरिक पोलिसांकडे तक्रार करतात. ज्या बँक खात्यांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांकडून पैसे भरले जातात, ती खाती तपासली असता त्या खात्यांमधून तत्परतेने पैसे काढले गेल्याचे लक्षात येते. यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे स्पष्ट होते; मात्र नागरिकांना ठकवणार्या या देश-विदेशातील टोळ्या सुनियोजित पद्धतीने आणि तांत्रिक कुशलतेने कार्यरत असल्याने त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता जवळपास नसते. यामुळे विनासायास कुणी आर्थिक लाभ कसा करून देईल आणि सतर्कतेचा अभाव यांमुळे सारासार विचार न केल्याने नागरिकांवर पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय रहात नाही.
४. काही नागरिकांना बँक व्यवहारासाठी एटीएमचा पिन क्रमांक किंवा आधारकार्ड क्रमांक विचारला जाऊन त्या माध्यमातून त्यांच्या अधिकोषातून पैसे काढून फसवणुकीचे प्रकार उघडकीस येणे
काही नागरिकांना अज्ञात व्यक्तींकडून भ्रमणभाषवर संपर्क करून लाघवी भाषेत संभाषण केले जाते. अनोळखी व्यक्ती चतुराईने संबंधित नागरिकाकडून बँक व्यवहारासाठी एटीम् पिन किंवा आधारकार्ड क्रमांक विचारून घेतात. सामान्य नागरिक सतर्क न राहिल्याने ते या बोलण्याला भुलतात आणि असे गोपनीय क्रमांक सहज देतात. त्यानंतर नागरिकांच्या अधिकोष (बँक) खात्यातून रक्कम काढली गेल्याचे उघड होते. हे आरोपी विविध ‘सिमकार्ड’ वापरून बनावट नावाने संपर्क करत असल्याने अशा प्रकरणांतही पोलिसांकडे तक्रार करून हाती काही लागत नाही. वास्तविक पहाता नागरिकांचा आधारकार्ड किंवा एटीएम् पिन क्रमांक संपर्क करून विचारला जात नसल्याचे बँकेकडून वेळोवेळी प्रबोधन केले जाते.
५. मोठे पारितोषिक लागल्याची ‘लिंक’ पाठवून ती क्लिक करण्यास सांगून लुबाडणूक केली जाणे
काही नागरिकांना आपणांस कार, शीतकपाट(फ्रीज), एलइडी टीव्ही यांसारख्या किमती वस्तू अथवा मोठ्या रकमेचे पारितोषिक लागल्याची किंवा विदेशातील पर्यटनासाठी निवड झाली असून त्याची तिकीटे लिंकने पाठवल्याची बतावणी केली जाते. हे पारितोषिक मिळण्यासाठी लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन केले जाते. सदर लिंकवर क्लिक केल्यास आपली वैयक्तिक गोपनीय माहिती जसे बँक खात्याचा तपशील आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने अनोळखी व्यक्तींच्या हाती लागते. ही माहिती मिळवून संबंधित नागरिकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले गेल्याचे प्रसंगही घडतात. अशा प्रकरणांतही शासन-प्रशासन यांच्याकडे दाद मागूनही हाती काही लागत नाही.
अशा प्रकारे ऑनलाईन लॉटरी लागल्याचे, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पारितोषिक मिळाल्याचेे संदेश, व्हॉट्सअॅप आणि ऑडिओ मेसेज मिळाल्यास किंवा पारितोषिक लागल्याची लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्याचे आवाहन केले गेल्यास त्याकडे दुर्लक्ष करून त्यास प्रतिसाद देऊ नये. असे संदेश तात्काळ पुसावेत. (डिलीट करावेत.) कोणी दूरभाष किंवा भ्रमणभाषवर आधारकार्ड अथवा एटीएम् पिन क्रमांक मागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. तसेच अशा प्रकारच्या भूलथापांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !