‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आदी सामाजिक माध्यमांवर इतरांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवतांना योग्य ती निश्‍चिती करा !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आदी सामाजिक माध्यमांवर इतरांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवतांना, तसेच स्वीकारतांना ‘नामसाधर्म्यामुळे गोंधळ होऊ नये’, यासाठी योग्य ती निश्‍चिती करा !

१. नामसाधर्म्यामुळे एक व्यक्ती साधकांच्या ‘फेसबूक’वरील ‘फ्रेंड लिस्ट’मध्ये असणे, संबंधित व्यक्तीने एका साधिकेला ‘चॅटिंग’द्वारे अयोग्य भाषेत प्रश्‍न विचारणे

‘फेसबूक’वर एकाच नावाची अनेक खाती (अकाउन्ट्स) असतात. एका जिल्ह्यातील एक साधक आणि एक व्यक्ती यांच्या नावात साधर्म्य असून तेथील अनेक साधक आणि साधिका त्या व्यक्तीच्या ‘फ्रेंड लिस्ट’मध्ये आहेत. सदर व्यक्तीने त्या जिल्ह्यातील एका साधिकेला ‘फेसबूक’वरून ‘चॅटिंग’द्वारे अयोग्य भाषेत अनावश्यक प्रश्‍न विचारले. तेव्हा संबंधित साधिकेने त्या व्यक्तीस ‘ब्लॉक’ केले (‘तिचे संदेश (मेसेज) येऊ नयेत’, अशी व्यवस्था केली). अन्य एका साधिकेलाही त्या व्यक्तीच्या संदर्भात असाच अनुभव आला. नामसाधर्म्यामुळे साधकांचा गोंधळ होत असल्याचे लक्षात आले.

२. इतरांच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारतांना, तसेच पाठवतांना ‘आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तीचेच खाते आहे ना ?’, हे पडताळून पहा !

‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आदी सामाजिक माध्यमांवर एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ (मैत्रीची विनंती) पाठवू शकते. त्यामुळे संबंधित व्यक्तीची निश्‍चिती केल्याविना तिची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये. ‘ती व्यक्ती परिचयाची आहे का ?’, हे पडताळण्यासाठी तिच्या खात्यावर जाऊन तिची छायाचित्रे, तसेच ‘पोस्ट’ पहाणे, ‘राष्ट्र आणि धर्म कार्य यांचा प्रसार करणे, हा तिचा हेतू आहे का ?’, आदी गोष्टी पहाव्यात.

एखाद्या व्यक्तीच्या खात्याला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवण्यापूर्वी ‘ते खाते आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तीचेच आहे ना ?’, हे पडताळून पहाणे आवश्यक आहे. अयोग्य व्यक्तीला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवल्यास भविष्यात अडचण येऊ शकते.

३. सामाजिक माध्यमांचा वापर करतांना सुरक्षेच्या दृष्टीने पुढील सूचनांचे पालन करा ! 

अ. ‘फ्रेंड लिस्ट’मध्ये आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तीच आहेत ना ?’, असे पहावे.

आ. सुरक्षेच्या दृष्टीने ‘फेसबूक मेसेंजर’ वापरणे टाळावे.

इ. सामाजिक माध्यमांचा वापर करण्याच्या संदर्भात शासन आणि प्रशासन यांच्याकडून प्रसारित केल्या जाणार्‍या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

या संदर्भात काही अडचणी किंवा शंका असल्यास आपल्या जिल्ह्यातील सामाजिक प्रसार माध्यमांच्या संदर्भातील सेवा करणार्‍या उत्तरदायी साधकांना संपर्क करावा.