शासनाच्या नियमांचे पालन करून भक्तांनी घरी राहून साजरी केली आषाढी एकादशी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – यंदा कोरोनामुळे प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळा मोठ्या प्रमाणात न भरवता शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री विठ्ठल भक्त आणि वारकरी यांनी घरी राहून श्री विठ्ठलाची पूजा केली, तर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह अन्य मानाच्या पालख्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पंढरपूर येथे आल्या. प्रत्येक पालखीसमवेत २० मानाचे वारकरी आले होते.
पंढरपूर येथे आल्यानंतर पालख्यांसमवेत असलेल्या भाविकांची आरोग्य विभागाच्या पथकाने ‘थर्मल स्क्रीनिंग’ केले, तसेच वाखरी तळावरील सर्व परिसर निर्जंतूक करण्यात आला होता. प्रत्येक पालखीला काही काळ विसावण्यासाठी लहान मंडपाची उभारणी करण्यात आली होती. या वेळी पंढरपूर नगरपालिका, पंचायत समितीच्या अधिकार्यांसमवेत आरती करून सर्व पालख्यांचे स्वागत करण्यात आले.