अस्नोडा : वीज कर्मचार्‍याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १० जुलै (वार्ता.) – १० जुलै या दिवशी अस्नोडा येथे कामावर असतांना विजेचा धक्का बसल्याने डिचोली म्हावळींगे येथील वीज खात्याच्या कर्मचारी मंथन आरोसकर (वय ३० वर्षे) याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार आरोसकर झाडाच्या फांद्या छाटत असतांना त्यांचा संपर्क वीजवाहिनीशी आला आणि त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी (आधुनिक वैद्यांनी) त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून काम करतांना अवलंबलेल्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे काम उच्च दाबाच्या ३३ केव्ही वीजवाहिनीजवळ केले जात असल्याचा आरोप करत कामावर देखरेख करण्यासाठी कोणताही वरिष्ठ अधिकारी तिथे का उपस्थित नव्हता ? यासाठी पुरेशी दक्षता का घेतली गेली नाही ?, असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. (नागरिकांचा रोष योग्य आहे; पण हा अपघात अन्य कुणीतरी वीजप्रवाह चालू केल्याने झाला कि कर्मचार्‍याने आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे झाला ? हे पहाणे आवश्यक आहे. कधी कधी अतीआत्मविश्वासही नडतो. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता काम केले पाहिजे ! – संपादक)

वीज कर्मचार्‍यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे ! – सुदिन ढवळीकर

या घटनेनंतर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ‘वीज खात्याच्या कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी असतांना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे’, अशी सूचना केली आहे. या घटनेविषयी दुःख व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘कर्मचार्‍यांनी योग्य सुरक्षा साधनांचा वापर केला पाहिजे. काम चालू करण्यापूर्वी वीजपुरवठा बंद असल्याची निश्चिती केली पाहिजे आणि वीजवाहिन्यांजवळ काम करतांना सर्व आवश्यक दक्षता घेतली पाहिजे.’’