Bengal Rape-Murder : बंगालमध्ये बलात्कार करणारा आरोपी पोलीस चकमकीत ठार

कोलकाता (बंगाल) – दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी प्रभास मंडल पोलिसांच्या चकमकीत ठार झाला.

१. पोलिसांनी म्हटले की, प्रभास मंडलने पळून जातांना एका पोलिसाची रायफल हिसकावून घेतली. त्यानंतर पोलीस आणि आरोपी यांच्यात चकमक झाली. त्यात प्रभास मंडलला गोळी लागली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

२. बारुईपूरमध्ये ११ वर्षांची मुलगी ४ जुलै या दिवशी बेपत्ता झाली होती. ५ जुलै या दिवशी तिचा मृतदेह एका तलावात सापडला. तिच्या डोक्यावर जखमांच्या खुणा होत्या. शवविच्छेदनातून असे समोर आले की, बलात्कारानंतर मुलगी जिवंत होती. आरोपींनी तिला जिवंतपणी तलावात फेकले होते.

३. तिचे फुफ्फुस आणि पोट यांमध्ये पाणी आढळले. बुडाल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. बलात्कार आणि हत्या यांच्या आरोपाखाली पोलिसांनी प्रभास मंडलसह ३ जणांना अटक केली होती.

असे कृत्य करणार्‍या मुलाविषयी सहानुभूती नाही, मृतदेहही स्वीकारणार नाही ! – मृत आरोपीच्या आईची भूमिका

आरोपी प्रभास मंडल याच्या आईने त्याच्या मृत्यूवर सांगितले की, सकाळी पोलीस घरी पोचले आणि त्यांनी मुलाच्या मृत्यूची माहिती दिली. मी त्यांना सांगितले की, मी रुग्णालयात जाणार नाही आणि मुलाचा मृतदेहही स्वीकारणार नाही. जर मुलगा पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करतांना मारला गेला असेल, तर ही त्याच्या कर्माचीच शिक्षा आहे. ज्या गुन्ह्यात त्याचे नाव समोर आले, त्यानंतर आमच्या मनात त्याच्याविषयी जराही सहानुभूती उरलेली नाही. जर मुलाचा नैसर्गिक मृत्यू झाला असता, तर शेवटचे त्याचे तोंड पहायला मी गेले असते; पण आता जाणार नाही.