स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेसाठी काँग्रेसने ठराव संमत केला होता ! – सात्यकी सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण !

स्वातंत्र्यवीर सावरकर

     पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ब्रिटीश सरकारने सुटका त्यांच्या दयेच्या अर्जांमुळे केली नव्हती, तर देशभरातून वाढत असलेल्या जनदबावामुळे त्यांना मुक्त करण्यात आले होते, असा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू श्री. सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात केला. वर्ष १९२३ मध्ये काँग्रेसच्या काकीनाडा अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या ठरावातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती आणि त्यांच्या सुटकेमागे तोही एक महत्त्वाचा घटक होता. जर काँग्रेसने भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या फाशीपूर्वीही अशाच प्रकारचा ठराव संमत केला असता, तर कदाचित त्यांची फाशी टाळता आली असती, असे सात्यकी सावरकर म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात ही सुनावणी झाली.

उलट पडताळणीच्या वेळी श्री. सात्यकी सावरकर यांनी सांगितले, सदर दयेच्या अर्जातील लिखाण स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले होते कि नाही, याची मला माहिती नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या दयेच्या अर्जात कोणत्या अटीवर सुटकेची मागणी केली होती, असे मी निश्चितपणे सांगू शकत नाही, तसेच त्यांनी ब्रिटीश सरकारकडे भविष्यात कोणत्याही राजकीय किंवा क्रांतीकारी चळवळीत सहभागी होणार नाही, या अटीवर सुटका मागितली होती, असेही मी सांगू शकत नाही; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुटका ही दयेच्या अर्जांचा परिणाम नव्हती.

पुढील सुनावणीत काँग्रेसच्या ठरावाची प्रत सादर करणार !

सात्यकी सावरकर यांनी सांगितले की, पुढील सुनावणीच्या वेळी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काकीनाडा अधिवेशनात संमत झालेल्या ठरावाची प्रत न्यायालयात सादर करणार आहेत.

त्या ठरावात असे नमूद करण्यात आले होते की,

१. आपल्याला माहिती आहे की, विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटीश शासनाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांच्या भावालाही अशीच शिक्षा झाली होती. गणेश सावरकर यांची सुटका करण्यात आली आहे; मात्र विनायक दामोदर सावरकर यांची सुटका करण्यात आलेली नाही.

२. त्यामुळे एका बंदीवानाच्या प्रकरणात सरकारच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आम्ही हा अपवाद करत आहोत. कारण या व्यक्तीला सूडबुद्धीने कारागृहात ठेवण्यात आले असून ते सुटकेस पात्र आहेत.

मोहनदास गांधी यांनी सावरकर यांच्या सुटकेसाठी लेख लिहिले होते

काँग्रेसला काही मान्य असो किंवा नसो मात्र जो ठराव सावरकर यांच्या सुटकेसाठी संमत झाला होता, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. अभिलेखागारात जे पुरावे आहेत, त्यात कुणी कुणी यात भाग घेतला होता त्यांची नावेही नमूद आहेत. राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य हे बिनबुडाचे आहे. मोहनदास गांधी यांनीही सावरकर यांची सुटका होण्यासाठी लेख लिहिले होते.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुटका दयेच्या अर्जांमुळे नाही, तर देशभरातून वाढत असलेल्या जनदबावामुळे !