‘तेजस एक्सप्रेस’च्या वक्तशीरपणात घट !

मुंबई – गेल्या ७ महिन्यांत मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेसचा वक्तशीरपणा २० टक्के आणि मुंबई-मडगाव तेजसचा वक्तशीरपणा ४५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तेजसमधील ‘इन्फोटेन्मेंट’ (रेल्वेची माहिती देणारी) सुविधा बंद आहे. आसनामागे ‘स्क्रिन’ऐवजी ‘प्लाय’ लावण्यात आले आहेत. कोकण आणि मध्य रेल्वेवर धावणार्‍या तेजस एक्सप्रेस, एल्.टी.टी.-मडगाव, सी.एस्.एम्.टी.-मंगळुरू या गाड्यांच्या वक्तशीरपणाची १ नोव्हेंबर २०२५ ते १८ मे २०२६ या कालावधीतील सत्यस्थिती माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आली होती.

१. मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस १४२ फेर्‍यांपैकी केवळ २९ वेळा वेळेवर धावली, तर मुंबई-मडगाव एक्सप्रेस १४२ फेर्‍यांपैकी केवळ ६४ वेळा वेळेवर धावली आहे, तर उर्वरित वेळेत तेजस एक्सप्रेस १ ते ७-८ घंट्यांपर्यंत विलंबाने धावली

२. एल्.टी.टी.-मडगाव आणि मडगाव-एल्.टी.टी. एक्सप्रेसचा किमान वक्तशीरपणा ३० टक्के, तर एल्.टी.टी.-करमाळी आणि करमाळी-एल्.टी.टी.चा वक्तशीरपणा २५ टक्के आहे.

तेजस एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे करमळीपर्यंत चालवून परत मुंबईला आणावी, लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव वातानुकूलित एक्सप्रेस करमाळी, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेस थिविम अथवा सावंतवाडी रोड स्थानकापर्यंत चालवावी. मडगाव एक्सप्रेस, वन्दे भारत, जनशताब्दी, तेजस या चारही गाड्या मडगावला एका मागोमाग जातात. यामुळे वरील पालट न झाल्यास एक्सप्रेस गाड्या कधीच वेळेवर धावू शकणार नाहीत, असे मत रेल्वे अभ्यासक श्रेयस पटवर्धन यांनी मांडले.

संपादकीय भूमिका

जास्त दर आकारूनही वक्तशीरपणासह अन्य सुविधा मिळत नसतील, तर प्रवाशांच्या होणार्‍या हानीला उत्तरदायी कोण ? याविषयी रेल्वे प्रशासनाने सांगावे !