राजापूरच्या लोकप्रतिनिधींचा लवकरच होणार ‘हिवरे बाजार’ अभ्यास दौरा ! – संतोष गांगण  

समृद्ध कोकणचे अध्यक्ष संतोष गांगण

राजापूर, १६ जून (वार्ता.) – ग्रामीण विकासात देशात आदर्श ठरलेल्या ‘हिवरे बाजार’ गावाची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी राजापूर तालुक्यातील सरपंच आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींसाठी विशेष अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती समृद्ध कोकणचे अध्यक्ष संतोष गांगण यांनी दिली.

नुकतेच रायपाटण येथे समृद्ध कोकण आणि जागृत सेवा मंडळ यांच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या ‘यशोगाथा ग्रामविकासाची’ या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या यशस्वी कार्यक्रमात उपस्थित लोकप्रतिनिधींना हिवरे बाजारचा एकत्रित अभ्यास दौरा आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याच आश्वासनाची पूर्तता आता होणार आहे.

जलसंधारण, प्रभावी पाणी व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, पारदर्शक प्रशासन आणि सक्रीय लोकसहभागाच्या जोरावर हिवरे बाजारने देशासमोर विकासाचा एक मोठा वस्तुपाठ ठेवला आहे. या परिवर्तनामागे असलेल्या पद्मश्री पोपटराव पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा आणि विकास मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी राजापूरच्या लोकप्रतिनिधींना या दौर्‍यात मिळणार आहे. ‘राजापूर तालुक्यातील गावांनीही स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करावी’, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा दौरा ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास समृद्ध कोकणने व्यक्त केला आहे. ‘तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा’, असे आवाहन करण्यात आले असून दौर्‍याचे सविस्तर नियोजन आणि सहभाग नोंदणीसाठी समृद्ध कोकणचे कार्यकर्ते लवकरच संबंधितांशी संपर्क साधणार आहेत.