FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा

नवी देहली – अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे आरोग्यविषयक दावे केल्याच्या प्रकरणी ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’ने अर्थात् ‘फूड सेफ्टी अँड स्टँडडर्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ने) ८ अन्न व्यवसाय चालकांना नोटिसा बजावल्या. यामध्ये इमामी हेल्दी अँड टेस्टी, हेल्थ एड, ट्रूव्ही, द हेल्दी फॅक्टरी, हेल्दी मास्टर, हेल्दी चॉईस, प्लॅन बी आणि न्यूहर्ब्स या आस्थापनांचा समावेश आहे. या आस्थापनांनी ‘अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६’चे उल्लंघन केल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

१. प्राधिकरणाने ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असलेल्या ‘हेल्दी’, ‘ट्रू व्हिटॅमिन’, ‘झिरो मैदा’ आणि ‘प्लांट-बेस्ड व्हेगन’ अशा दाव्यांवर आक्षेप घेत ‘काही उत्पादनांवरील दावे आणि ब्रँड नावे प्रत्यक्ष घटकांशी किंवा त्यांच्या अनुमतीच्या स्वरूपाशी सुसंगत नसून ग्राहकांमध्ये चुकीची धारणा निर्माण करू शकतात’, असे म्हटले आहे.

२. यापूर्वीही मॅगी, के.एफ्.सी., फ्लिपकार्ट आणि ओपन सिक्रेट्स संदर्भात तक्रारींची नोंद घेत कारवाई करण्यात आली होती.

३. अन्नपदार्थांची विज्ञापने आणि ‘लेबलिंग’मध्ये पारदर्शकता राखण्यासाठी ही मोहीम पुढेही चालू रहाणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.