(‘स्टेटस्’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर ठेवलेले छायाचित्र, व्हिडिओ किंवा लिखाण)
नगर – व्हॉट्सॲपवरील ‘स्टेटस्’ची वाढत चाललेली ईर्ष्या आपला आनंद हरवण्यास कारणीभूत ठरू लागली आहे. ईर्ष्या करणारा भगवंतापासून दूर जातो. अलीकडे स्टेटसची ईर्ष्या इतकी वाढली आहे की, जेवायला बसल्यावर ताटाचे छायाचित्र काढून पाठवले जाते. छायाचित्र पाहिले जात नाहीत, तोपर्यंत ताटातील जेवणाचा आनंद घेतला जात नाही, असे मार्गदर्शन ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. ते येथील नवीन टिळक रस्त्यावरील माऊली सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या श्रीमद्भागवत कथा निरूपण सोहळ्याचे द्वितीय पुष्प गुंफतांना बोलत होते. या वेळी इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, अशोक कानडे, मदन कांबळे, कैलास चोथे, ह.भ.प. मिलिंद चवंडके, डॉ. (सौ.) अंजली फाटके यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमान रेवतीनंदन दास पुढे म्हणाले की, इर्षा मनुष्याचा शत्रू आहे. आपली हानी झाली तरी चालेल; पण दुसर्याचे भले होऊच नये, अशी ही इर्षा होय. इर्षा करायचीच असेल, तर भगवंताच्या संकीर्तनाची करावी. भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने इर्षा जीवनातून निघून जाते. सौंदर्य, ज्ञान, धन, प्रसिद्धी, वैराग्य असे ऐश्वर्य असलेले भगवान श्रीकृष्ण असून छळ-कपट नसलेला भागवत ग्रंथ परम कल्याण करणारा आहे. भागवत श्रवणाच्या इच्छेने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. भागवत श्रवणासाठी निघाल्यावर पावलो-पावली गोदानाचा लाभ मिळत जातो. श्रवण ही भगवंताची सर्वश्रेष्ठ सेवा. श्रद्धा आणि भक्तीने श्रवण करावे. व्यसन, मांसाहार, व्यभिचार करू नये.
श्रीकृष्ण कथेने कान तृप्त होतात. अंत:करण संतुष्ट होते. भगवान श्रीकृष्ण नामाने आत्म्याला संतुष्टता मिळते. भक्तीनेच भगवंताला प्राप्त करता येते. शाश्वत आनंदाची प्राप्ती भक्तीनेच मिळते. भगवंताच्या नावातच सुख सामावलेले आहे. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत सर्व शास्त्रांचे सार आहे. श्रीकृष्ण भक्तीने ३३ कोटी देवी-देवता प्रसन्न होतात. व्यासांनी सर्व शास्त्रांचे कथन करून काढलेले अमृत श्रीमद् भागवत आहे. जीवनाच्या उद्धाराचा मार्ग भागवत दाखवून देते, असा ठाम विश्वास श्रीमान रेवतीनंदन दास यांनी व्यक्त केला.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !