‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’कडून वाढत्या उष्णतेत भाविकांसाठी विशेष सुविधा !

पंढरपूर – अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत असतांना वाढत्या उष्णतेचा त्रास अल्प व्हावा, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून दर्शन रांगेत ठिकठिकाणी तुषार फवारणी (स्प्रिंकलर) यंत्रणा चालू करण्यात आली आहे, तसेच भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, लिंबू सरबत आणि प्राथमिक उपचार केंद्राची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक श्री. प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी विविध सेवा-सुविधा पुरवण्यात येत आहेत. २७ ते २९ मे या काळात दर्शन रांगेतील भाविकांसाठी खिचडी आणि भोजनाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे, तसेच ‘भाविकांनी दर्शनासाठी कुणालाही पैसे देऊ नयेत’, असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे. अधिक मासामुळे विठुरायाच्या लाडू प्रसादाचीही मागणी वाढली असून मंदिरे समितीने प्रतिदिन सुमारे ३० सहस्र लाडू सिद्ध करण्याचे नियोजन केले आहे.