नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५ शाळा अनधिकृत !

नवी मुंबई, २१ मे (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५ शाळा अनधिकृत असल्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्वेक्षण केले होते. (या अनधिकृत शाळा उभ्या राहीपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी काय करत होते ? – संपादक) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत एक प्राथमिक शाळा शासनाची/नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘आर्.टी.ई. अधिनियम २००९’ मधील कलम-१८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेविना चालवता येत नाही. त्यामुळे संबंधित शाळा व्यवस्थापकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून जवळील महापालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खासगी शाळेत पुढील शिक्षणासाठी प्रविष्ट करावे. अनुमतीविना चालू केलेली शाळा बंद करावी. अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत. ज्या पालकांनी स्वत:च्या पाल्यांचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी ते पाल्यांचे प्रवेश रहित करून जवळील शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा. जेणेकरून त्यांची शैक्षणिक हानी होणार नाही, असे आवाहन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केले आहे.

अनधिकृत शाळा पुढीलप्रमाणे आहेत

१. ‘इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट’ची ‘अल मोमिना स्कूल’, सी.बी.डी.

२. ‘ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट’ची ‘इकरा इंटरनॅशन ॲण्ड मक्तब स्कूल’, नेरूळ

३. ‘एक्सलेंस चॅरिटेबल ट्रस्ट’ची ‘ॲग्नल प्रि-प्रायमरी कॉनव्हेन्ट स्कूल’, खैरणेगाव

४. ‘गुरुदास सेवा समिती’ची विश्वभारती स्कूल, कोपरखैरणे

५. ‘किंगडम वेलफेअर चारिटी ॲन्ड कॉनव्हेन्ट’ यांची ‘चिरिस्ट द किंग सेकंडरी स्कूल’, कोपरखैरणे