फोंडा येथील राजकीय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे सर्पदंशाने निधन

उत्तरीय तपासणीत विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट

डॉ. केतन भाटीकर

पणजी, १५ मे (वार्ता.) – गोव्यातील प्रसिद्ध भौतिकोपचारतज्ञ आणि फोंडा विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी रहित झालेल्या पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर (वय ४१ वर्षे) यांचे १४ मेच्या उत्तररात्री सर्पदंशाने निधन झाले. त्यांच्या मृतदेहाच्या उत्तरीय पडताळणी अहवालानुसार सापाचे विष झपाट्याने शरिरात पसरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार डॉ. भाटीकर हे दांडेलीहून गोव्याकडे परतत असतांना वाटेत अनमोड घाट परिसरात लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. त्या वेळी त्यांचा भ्रमणभाष खाली पडल्याने तो उचलतांना त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि विषाचा परिणाम वाढल्याने रुग्णालयात भरती होण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध भौतिकोपचार तज्ञ, राजकारणी असे व्यक्तीमत्त्व असलेले डॉ. केतन भाटीकर यांची कारकीर्द आरोग्यसेवा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय होती.

दांडेलीहून गोव्याकडे परतत असतांना डॉ. भाटीकर यांच्या समवेत त्यांचे सहकारी सुशांत कवळेकर होते. तेच चारचाकी वाहन चालवत होते. कवळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या वेळी पाऊस पडत होता, भ्रमणभाषवरूनही संपर्क होत नव्हता. पहाटे ३.३२ वाजता त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून धारबांदोडा आरोग्य केंद्रात आणण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया

डॉ. भाटीकर यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

प्रख्यात भौतिकोपचारतज्ञ डॉ. केतन भाटीकर यांचा अचानक मृत्यू झाल्याचे कळल्यावर धक्का बसला. त्यांचे मित्र आणि कुटुंबीय यांच्याविषयी मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. डॉ. भाटीकर यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो !

डॉ. केतन भाटीकर यांचे फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयाविषयीचे स्वप्न सरकारने पूर्ण करावे ! – दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगो पक्ष

मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी डॉ. केतन भाटीकर यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘डॉ. केतन भाटीकर यांचे फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयाविषयीचे स्वप्न सरकारने पूर्ण करावे. सरकारने या रुग्णालयात रक्तपेढी, सीटी स्कॅन यांसारख्या प्रमुख सेवा चालू कराव्यात.’’

डॉ. भाटीकर यांचा मृत्यू धक्कादायक आहे. समाजासाठी त्यांचे योगदान कालातीत आहे. समस्त गोमंतकियांना हा धक्का आहे – गोवा प्रदेश काँग्रेस

डॉ. केतन भाटीकर आपल्यात नाहीत, हे वास्तव पचवणे अवघड आहे. अजूनही विश्वास बसत नाही. जे काही घडले ते धक्कादायक आहे. ते कार्यरूपी अमर रहातील. – काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर

डॉ. केतन भाटीकर यांनी निस्वार्थीपणे सामाजिक कार्य केले. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे होते. त्यांची उणीव निश्चितपणे जाणवेल. – रितेश रवि नाईक, नगरसेवक, फोंडा