अकोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त भव्य वाहनफेरी !

अकोला – येथे ३ मे या दिवशी श्री एकवीरा मैदान, गोरक्षण रस्ता येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त २ मे या दिवशी भव्य वाहनफेरी काढण्यात आली. फेरीने शहरात हिंदुत्वाचा जयघोष करत चैतन्य पसरवले. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित वाहनफेरीचे भाजप, अकोला महानगरच्या वतीने हुतात्मा चौकात भव्य स्वागत करण्यात आले. भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी फेरीचे स्वागत केले. या वेळी प.पू. ईश्वरदासजी महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सौ. अर्चना शर्मा यांनी स्वागताचे नियोजन केले होते.

श्री राजराजेश्वर मंदिर येथे श्री कालीचरण महाराज यांचे गुरुबंधू ईश्वरदासजी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करण्यात आले. शंखनादाने फेरीचा प्रारंभ झाला. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. श्री एकवीरा मैदान येथे ध्येयमंत्राने फेरीची सांगता झाली. या वेळी श्री. घनवट यांच्यासह हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितांना सभेला येण्याचे आवाहन केले.

उपस्थित मान्यवर : उपमहापौर अमोल घोगे, नगरसेविका वैशालीताई शेळके आणि मंजुषाताई शेळके, माजी महापौर विनोद मापारी, युवा सेना जिल्हाप्रमुख निखिल ठाकूर, धनंजय धवाडे, पंकज गावंडे, कुणाल शिंदे, नीलेश काळे, विजय इंगळे, मयूर शर्मा, सकल राजपूत समाजाचे आकाश ठाकूर, तसेच स्वराज नवनिर्माण फाउंडेशन, रामनवमी शोभायात्रा समिती आणि सिंधी समाजाचे प्रतिनिधी