माधव खट्टर यांना जामीन संमत

वास्को येथे फ्रान्सिस झेविअर याचा कथित अवमान केल्याचे प्रकरण

गौतम खट्टर यांचे भाषण माधव खट्टर यांनी लिहिले नसल्याचे सत्य उघड !

पणजी, २८ एप्रिल (वार्ता.) – वास्को येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात गौतम खट्टर या हिंदुत्वनिष्ठाने फ्रान्सिस झेविअर याच्याविषयी कथिर रूपाने असभ्य भाषेत वक्तव्य केल्याच्या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. गौतम खट्टर सध्या पोलिसांच्या कह्यात असून या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने प्रारंभी ‘वास्को येथील कार्यक्रमात गौतम खट्टर यांनी केलेले भाषण माधव खट्टर यांनी लिहून दिले होते’, या मुख्य आरोपावरून गौतम खट्टर यांचे लहान बंधू १८ वर्षांचे महाविद्यालयीन विद्यार्थी असलेले माधव खट्टर यांना कह्यात घेतले होते; मात्र वास्को येथील कार्यक्रमात केलेले भाषण आपण स्वत:च लिहिल्याचे गौतम खट्टर यांनी पोलीस जबाबात सांगितल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात सांगितल्याने माधव खट्टर यांचा या प्रकरणात कसलास सहभाग नसल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने माधव खट्टर यांची २८ एप्रिल या दिवशी जामिनावर सुटका केली आहे.

माधव खट्टर यांना कह्यात घेण्याची कृती पूर्णपणे अन्यायकारक ! – माधव खट्टर यांचे अधिवक्ता अमेय प्रभुदेसाई 

माधव खट्टर यांचे अधिवक्ता अमेय प्रभुदेसाई म्हणाले, ‘‘माधव खट्टर यांना गुन्हे अन्वेषण विभागाने कह्यात घेण्याची कृती पूर्णपणे अन्यायकारक आहे. माधव खट्टर यांचे वय १८ वर्षे आहे. एखाद्याला कह्यात घ्यायचे असेल, तर त्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असते. अशा प्रकरणी सर्वाेच्च न्यायालय अथवा अन्य न्यायालये यांनी वेळोवेळी महत्त्वपूर्ण निवाडे दिलेले आहेत. ज्या गुन्ह्यामध्ये ७ वर्षांखालील कारावासाची शिक्षा असते, अशा प्रकरणी कह्यात घेतल्या जाणार्‍या व्यक्तीला भारतीय न्याय संहितेचे कलम ३५ ‘ब’नुसार पूर्व नोटीस देणे बंधनकारक असते. या प्रकरणी कायद्याला बगल देऊन माधव खट्टर यांना कह्यात घेण्यात आले आहे. विशेष करून संशयित १८ वर्षांचा असेल अशा प्रकरणीही असे होणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे या प्रकरणी माधव खट्टर यांना कह्यात घेण्याची कृती पूर्णपणे अन्यायकारक आहे.’’

पणजी येथील न्यायालयीन सुनावणीविषयी पत्रकारांना अधिक माहिती देतांना माधव खट्टर यांचे अधिवक्ता म्हणाले, ‘‘माधव खट्टर यांना कह्यात घेतल्याच्या प्रकरणी न्यायालयाने २८ एप्रिल या दिवशी सकाळी आमची बाजू ऐकून घेतली आणि जामिनावरील निकाल सायंकाळपर्यंत राखून ठेवला. गौतम खट्टर यांनी वास्को येथील कार्यक्रमात केलेले भाषण हे स्वत:च लिहिल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे माधव खट्टर यांच्यावर आता कोणताही आरोप राहिलेला नाही.’’

माधव खट्टर यांच्यावर आणखी एक अन्याय !

माधव खट्टर यांची ४ दिवसांची पोलीस कोठडी रविवार, २६ एप्रिल या दिवशी संपली. त्यानंतर त्यांना सोमवार, २७ एप्रिल या दिवशी न्यायालयात उपस्थित करून त्याच दिवशी जामीन मिळणे अपेक्षित होते; पण २७ एप्रिल या दिवशी केवळ जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला. २८ एप्रिलला दिवसभर सुनावणी झाल्यावर सायंकाळपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला, म्हणजे पूर्ण दिवसही ते पोलिसांच्याच कह्यात होते. अशा प्रकारे माधव खट्टर यांना पोलीस कोठडी व्यतिरिक्त आणखी २ दिवस पोलिसांच्या कह्यात रहावे लागले.

माधव खट्टर यांना अन्यायपूर्वक कह्यात घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याच्या विरोधात हानीभरपाईचा दावा करणार ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधिज्ञ परिषद

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

माधव खट्टर यांची जामिनावर सुटका झाल्याच्या प्रकरणी हिंदु विधिज्ञ परिषदचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले, ‘‘हिंदुत्वनिष्ठ गौतम खट्टर यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या कह्यात असलेले श्री. गौतम खट्टर यांचे लहान बंधू माधव खट्टर यांची २८ एप्रिल या दिवशी पणजी येथील न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. अधिवक्ता नागेश जोशी आणि अधिवक्ता अमेय प्रभुदेसाई यांनी या प्रकरणी न्यायालयात युक्तीवाद केला, तर मुंबई येथून अधिवक्ता घन:श्याम उपाध्याय यांनी या प्रकरणाची संपूर्ण धुरा सांभाळली. अधिवक्ता योगेश देशपांडे यांनी या प्रकरणी साहाय्य केले. या प्रकरणी गौतम खट्टर यांची योग्य बाजू न्यायालयासमोर मांडणार्‍या संबंधित सर्व अधिवक्त्यांचे मी अभिनंदन करतो. या प्रकरणी ज्या पोलीस अधिकार्‍याने माधव खट्टर यांना अन्यायपूर्ण कह्यात घेतले, त्याच्या विरोधात न्यायालयात हानीभरपाई देण्याविषयी याचिका प्रविष्ट (दाखल) केली जाणार आहे, तसेच संबंधित पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.’’

गौतम खट्टर यांनाही लवकरच जामीन मिळणार !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर पुढे म्हणाले, ‘‘वास्को येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावल्याचे कथित वक्तव्य केल्याच्या प्रकरणी गौतम खट्टर यांचीही लवकरच जामिनावर सुटका होणार होणार आहे आणि या प्रकरणी त्यांना न्याय मिळणार आहे. यामुळे हिंदु राष्ट्राचा गजर होणार आहे.’’

संपादकीय भूमिका

  • असे आहे, तर संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा !
  • माधव खट्टर यांची जी अपकीर्ती झाली, ती गोव्याचे पोलीस खाते भरून देणार का ?
  • १८ वर्षांच्या महाविद्यालयीन मुलाला केवळ संशयावरून गोव्यात आणून ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवणे कितपत योग्य ?
  • गोवा सरकारने यात लक्ष घालून माधव खट्टर यांना न्याय मिळवून द्यावा !