१ मेपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ‘आपली बस आपली सेवा’ उपक्रम राबवणार !

मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १ मेपासून ‘आपली बस आपली सेवा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

१. या अभियानांतर्गत चालक आणि वाहक हे केवळ कर्मचारी न रहाता ‘सेवक’ बनणार आहेत. प्रवास चालू करण्यापूर्वी बसची स्वच्छता करणे, वेळेआधी फलाटावर उपस्थित रहाणे, नीटनेटका गणवेश परिधान करणे आणि शिस्तबद्ध वर्तन करणे यांना आता केवळ नियमांची चौकट नसून ती सेवाभावाची ओळख मानली जाणार आहे.

२. बस सुटण्यापूर्वी चालकाने स्वतःची ओळख करून देत प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ यांची माहिती देणे या माध्यमांतून प्रवाशांशी सुसंवाद साधण्यात येईल. प्रवासात चालक-वाहक नेहमीच आवश्यकतेनुसार साहाय्य करतील.

३. स्वच्छता राखणे, मौल्यवान वस्तूंचे दायित्व घेणे, तसेच मोठे सामान योग्य ठिकाणी ठेवणे या साध्या सवयीही प्रवास सुखकर बनवतील.

४. बस रहित झाल्यास किंवा मार्गात अडथळे निर्माण झाल्यास प्रवाशांना तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.

५. बसस्थानके आणि परिसर स्वच्छ, सुरक्षित अन् सुसज्ज ठेवण्याचे दायित्व संबंधित अधिकार्‍यांवर निश्चित करण्यात आली आहे.

६. प्रवाशांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर नियमित आढावा घेत सेवेतील उणिवा दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.

चालक-वाहक कर्मचारी न रहाता ‘सेवक’ होणार !

१ मे २०२६ पासून राज्यभर राबवण्यात येणारे हे अभियान केवळ सेवा सुधारण्याचा उपक्रम नसून एस्.टी. आणि प्रवासी यांच्यातील विश्वासाचा नवा सेतू ठरणार आहे. लालपरीच्या चाकांना आता केवळ वेग नाही, तर संवेदनशीलतेचीही दिशा मिळणार आहे. ‘आपली बस, आपली सेवा’ हा मंत्र प्रत्यक्षात उतरल्यास प्रत्येक प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्याचा मार्ग न रहाता तो सुखद, सन्मानपूर्वक आणि समाधानकारक अनुभव ठरेल.

– परिवहनमंत्री प्रताप सरनाईक