हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त हडपसर (पुणे) येथे वाहनफेरी उत्साहात पार पडली !

२०० हून अधिक धर्मप्रेमींचा सहभाग !

फेरीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

हडपसर (जिल्हा पुणे) – येथे ५ एप्रिल या दिवशी होणार्‍या सभेसाठी ३ एप्रिल या दिवशी भव्य वाहनफेरी काढण्यात आली. सभेचे रणशिंग फुंकण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुचाकींवरील फडकत असलेले भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषेतील स्वाभिमानी हिंदुत्वनिष्ठ आणि ‘हिंदू ऐक्य’ अन् ‘हिंदुत्वा’चा गौरव करणार्‍या घोषणांनी संपूर्ण वातावरण वीरश्रीयुक्त झाले होते. या वाहनफेरीला ‘जय शंकर प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष विप्र शिरोमणी श्री. सु.द. उपाख्य पप्पाजी पुराणिक यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून प्रारंभ करण्यात आला. पूजाविधी श्री. संतोष वैद्य आणि श्री. प्रशांत मुकादम यांनी सांगितला. मार्गातील अनेक ठिकाणी फेरीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. वाहन फेरीमध्ये २०० हून अधिक धर्मप्रेमी १०० वाहनांसह सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय प्रमाणात होती. या वेळी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि सनातनच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ फेरीत सहभागी झाले होते.

भेकराईनगर पी.एम्.पी.एम्.एल्. बस डेपो येथून या वाहनफेरीला प्रारंभ झाला. फेरीचा समारोप प्रगती मित्र मंडळ, प्रगती चौक येथे झाला. या वेळी ‘हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील होऊया’, ‘मनामनात श्रीराम, प्रत्येक श्वासात श्रीराम’, ‘धर्मशिक्षण हाच खरा धर्मरक्षणाचा उपाय’ यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. समारोपाच्या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी उपस्थितांना संबोधित केले.

हिंदुत्वनिष्ठ श्री. हनुमंत गावडे, नगरसेवक नितीन गावडे, फुरसुंगी (उरळी देवाची) येथील नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. मोनिका नीलेश पवार, उद्योजक सागर ससाणे यांनी फेरी आणि धर्मध्वज यांचे स्वागत केले. एके ठिकाणी स्वागतासाठी फटाके वाजवण्यात आले.

वाहनफेरीच्या आदल्या दिवशी पुणे शहर आणि परिसर येथे मुसळधार पाऊस पडला होता; मात्र वाहनफेरीच्या दिवशी सद्गुरु आणि संत यांचा संकल्प अन् त्यांनी केलेली प्रार्थना यांमुळे पाऊस पडला नाही, असा उपस्थितांचा भाव होता. संपूर्ण वाहनफेरी निर्विघ्नपणे पार पडली.

क्षणचित्रे

१. हडपसर येथील धर्मसभेला संबोधित करणार्‍या वक्तांचे ‘कट आउट’ (फलक) वाहनफेरीमध्ये सहभागी झालेल्या धर्माभिमान्यांनी हातात घेतले होते.

२. हिंदु राष्ट्र-जागृती सभेची माहिती सांगणारी चलचित्रफीत एका टेंपोमध्ये दाखवण्यात येत होती.

५ एप्रिल या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा

वार : रविवार  वेळ : सायंकाळी ६

स्थळ : कै. मारुतराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ, हडपसर, जिल्हा पुणे