श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या बलीदानाचा इतिहास सांगणारे ‘हिंद की चादर’ पुस्तकाचे प्रकाशन !

निगडी प्राधिकरण (पुणे) येथे ‘विराट हिंदु संमेलन’ !

(‘हिंद की चादर’ म्हणजे भारताची ढाल)

पुस्तकाचे प्रकाशन करतांना (डावीकडून तिसरे) डॉ. संजय उपाध्ये, (डावीकडून चौथे) डॉ. गिरीश आफळे आणि मान्यवर

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – धर्मांध औरंगजेबाने काशी विश्वनाथ आणि मथुरेचे केशवदेव मंदिर पाडून हिंदूंना बाटवण्याचा सपाटा लावला होता. अशा कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या रक्षणार्थ श्री गुरु तेगबहादुरजी धावून आले. त्यांचे राष्ट्र-धर्म रक्षणासाठीचे अतुलनीय बलीदान नव्या पिढीने वाचणे अत्यंत आवश्यक आहे. अशा बलीदानांमुळेच हिंदु धर्म आजही टिकून आहे, असे वक्तव्य सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. निगडी प्राधिकरण येथे २९ मार्च या दिवशी आयोजित ‘विराट हिंदु संमेलनात’ ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. गिरीश आफळे लिखित आणि ‘भारतीय विचार साधना, पुणे’ प्रकाशित ‘श्रीगुरु तेग बहादुरजी – हिंद की चादर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगजेबाचा क्रूर इतिहास आणि श्री गुरूंचे धर्मरक्षण !

पुस्तकाचे लेखक डॉ. गिरीश आफळे यांनी या वेळी औरंगजेबाच्या क्रूरतेविषयी इतिहास मांडला. ते म्हणाले की, औरंगजेबाने श्री गुरु तेगबहादुरजी आणि त्यांचे ३ शिष्य यांना अटक करून ४० दिवस त्यांचा अतोनात छळ केला. त्यांना मुसलमान होण्याचा पर्याय दिला होता; मात्र श्री गुरूंनी धर्मांतर नाकारले. त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या ३ प्रिय शिष्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आले, तरीही श्री गुरु डगमगले नाहीत. अखेर ११ नोव्हेंबर १६७५ या दिवशी देहलीच्या चांदणी चौकात त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

१. त्या वेळी हिंदु धर्म आणि शीख पंथ हे वेगवेगळे नसून परस्परांमध्ये दुधात साखर मिसळावी तसे मिसळून गेले होते. कालांतराने इंग्रजांनी हिंदू आणि शीख हे वेगळे आहेत, हा प्रचार केला अन् पुढे मार्क्सवादी इतिहासकारांनी तो प्रचार तसाच उचलून धरला.

. बंजारा समाज आणि वाल्मिकी (सफाई कर्मचारी) समाज यांचा श्री गुरूंच्या जीवनात किती आणि कसा महत्त्वाचा भाग होता ? हे लेखकाने विस्तृतपणे सांगितले आहे.

३. औरंगजेबप्रेमी लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी हे पुस्तक पुष्कळच उपयुक्त ठरील.

मान्यवरांची उपस्थिती  

या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय उपाध्ये, तसेच ‘देहूरोड गुरुद्वारा’चे अध्यक्ष गुरुमित सिंह रत्तू, तसेच संमेलनाचे अध्यक्ष सूर्यकांत मुथियन, ह.भ.प. विनया कोल्हटकर, डॉ. माधवी महाजन, स्व. दत्तोपंत म्हसकर संस्थेचे सचिव मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्रीगुरु तेगबहादुरजींचे बलीदान !

हे पुस्तक तरुणांनीच नव्हे, तर सर्वांनी अवश्य वाचले पाहिजे. आज आपण जे काही हिंदू म्हणून शेष आहोत, त्यांच्यासाठी आत्मबलीदान करणार्‍यांमध्ये श्री गुरु तेगबहादुरजी हे अग्रेसर होते. औरंगजेबाने १६८९ यावर्षी अत्यंत क्रूरपणे छळ करून छत्रपती संभाजी महाराज यांनाही ठार केले होते.