परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी शासन कटिबद्ध !

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत ग्वाही

  • देशाकडे २ महिन्यांचा तेलसाठा !

महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे आणण्यासाठी शासन कटिबद्ध

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – युद्धजन्य परिस्थितीमुळे ज्या देशांची विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे, तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी राज्यशासन केंद्र सरकारच्या समन्वयाने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. विदेशात अडकलेल्या भारतियांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 

१. हवाई वाहतूक बंद झाल्यावर राज्यशासनाने तातडीने केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. संबंधित देशांतील भारतीय दूतावासांना सक्रीय करण्यात आले असून तिथे अडकलेल्या नागरिकांना दूतावासाच्या संपर्कात रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२. या संपूर्ण प्रकरणाच्या समन्वयाचे दायित्व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवले आहे. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी विशेष ‘व्हॉट्सॲप हेल्पलाईन’ कार्यान्वित केली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सुव्यवस्थित कार्यवाही !

राज्यशासनाने या नागरिकांना परत आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची सिद्धता दर्शवली होती; मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव ही प्रक्रिया केंद्र सरकारच्या अखत्यारित राहील, असा समुपदेश देण्यात आला आहे. केंद्र सरकार एअर इंडियाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने भारतियांना मायदेशी परत आणत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा अशा प्रतिकूल परिस्थितीतून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचा अनुभव असून सर्व नागरिक लवकरच सुखरूप आपल्या मायदेशी परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.