‘युनिटी मॉल’च्या सर्वेक्षणावरून वाद : पूर्ण ‘तोयार’ तळ्याचे आज सर्वेक्षण

पणजी, २३ जानेवारी (वार्ता.) – चिंबल येथील प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ भागातील सर्वेक्षणावरून अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये २३ जानेवारी या दिवशी वाद निर्माण झाला आणि त्यामुळे २३ जानेवारीला सर्वेक्षण करण्यात आले नाही. ‘तोयर’ तळे ते प्रस्तावित ‘युनिटी मॉल’पर्यंतच्या पूर्ण भागाचे आता २४ जानेवारी या दिवशी ‘ड्रोन’ आणि ‘गुगल इमेजरी’ यांच्या साहाय्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी आलेल्या सरकारी अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ आणि ‘प्रशासन स्तंभ’ यांच्या विरोधात चिंबल ग्रामस्थांचे आंदोलन २६ व्या दिवशीही चालूच राहिले आहे.

१. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत चिंबल ग्रामस्थांची २१ जानेवारी या दिवशी बैठक झाली होती. या बैठकीत ‘तोयार’ तळ्याचे प्रभावित क्षेत्र निश्चित करणे आणि प्रस्तावित ‘युनिटी मॉल’पर्यंतच्या जागेचे सर्वेक्षण करणे यावर एकमत झाले होते. या बैठकीत ठरल्यानुसार जलस्रोत खात्याचे प्रधान अभियंता, गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव आदी २३ जानेवारी या दिवशी सर्वेक्षणासाठी आले.

२. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने अधिवक्त्या मलीसा म्हणाल्या, ‘‘सर्वेक्षणासाठी आलेले सरकारी अधिकारी केवळ सर्व्हे क्रमांक ४०/१ आणि ‘तोयार’ तळ्याचे प्रभावित क्षेत्र यांचेच सर्वेक्षण करणार होते; मात्र मुख्यमंत्र्यांनी नव्याने पूर्ण ४ लक्ष ५० सहस्र चौ.मी. विभागाचे सर्वेक्षण करून पाणलोट विभागाचे सीमांकन करण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते.’’

३. यामुळे अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. आंदोलनकर्त्यांच्या मते प्रस्तावित ‘युनिटी मॉल’जवळील पाणलोट क्षेत्र अयोग्य प्रकारे अधिसूचित करण्यात आले आहे. यामुळे नव्याने सर्वेक्षण करून पाणलोट क्षेत्र पुन्हा अधिसूचित करणे आवश्यक आहे. यामध्ये पाणी निचरा विभाग, ‘बफर’ विभाग आणि ‘तोयार’ तळ्याचे प्रभावित क्षेत्र यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

नव्याने सर्वेक्षण करण्यास ३-४ दिवस लागणार

सर्वेक्षणाचा भाग मोठा असल्याने या प्रक्रियेला ३-४ दिवस लागणार आहेत. या सर्वेक्षणात सरकारच्या वतीने भूमी अभिलेख संचालनालय, गोवा राज्य जैवविविधता मंडळ, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, जलस्रोत खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ यांचे अधिकारी सहाभागी होणार आहेत. आंदोलनकर्त्यांच्या वतीने यामध्ये वास्तुविशारद हिकीन्थ पिंटो आणि जलशास्त्रज्ञ स्मीतेश यांच्यासह इतर पाच सदस्य या सर्वेक्षणावर देखरेख ठेवणार आहेत.