Balochistan Attack : बलुचिस्तानमध्ये सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून शस्त्रे लुटली  

बंदीवानांचीही केली सुटका

क्वेट्टा (बलुचिस्तान) – बलुचिस्तान प्रांतातील खारान शहरातील मुख्य पोलीस ठाणे, सरकारी तसेच खासगी बँका यांवर सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी तोडफोड करून लुटमार केली. पोलिसांची शस्त्रे लुटण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आक्रमणकर्त्यांकडून पोलीस ठाण्यात असणार्‍या बंदीवानांची सुटका करण्यात आली.

स्थानिक रहिवाशांच्या मते मोठ्या संख्येने सशस्त्र लोक शहरात शिरल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली. दुकाने बंद झाली आणि नागरिक घरात आश्रय घेऊ लागले.

घटनेनंतर सुरक्षायंत्रणांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून आक्रमणकर्त्यांच्या शोधासाठी शोधमोहीम चालू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही संघटनेने आक्रमणाचे दायित्व स्वीकारल्याची माहिती देण्यात आलेली नाही.