फोंडा येथील ऐतिहासिक मर्दनगड अधिसूचित करणार !

  • गोवा विधानसभेत आमदार कृष्णा साळकर यांच्या खासगी ठरावावर पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांची घोषणा

  • गोव्यातील सर्व किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘किल्ला विकास प्राधिकरण’ स्थापण्याचे विचाराधीन

  • ‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या मागणीला यश

श्री सुभाष फळदेसाई आणि आमदार दाजी साळकर यांचे अभिनंदन करतांना मर्दनगड संवर्धन समितीचे सदस्य

पणजी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि धैर्य यांचे प्रतीक असलेल्या फोंडा येथील मर्दनगडाचे संवर्धन, संरक्षण आणि सौंदर्यीकरण होणे आवश्यक आहे. हा ऐतिहासिक मर्दनगड ‘वारसा स्थळ’ म्हणून संरक्षित करण्यात येणार आहे. सरकार अर्थसंकल्पात प्रावधान करून मर्दनगडाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बांधणे, स्वच्छता आदी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातीलही सर्व किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ‘किल्ला विकास प्राधिकरण’ स्थापन करण्यावरही गोवा सरकार विचार करणार आहे, अशी घोषणा गोव्याचे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी गोवा विधानसभेत ८ ऑगस्ट या दिवशी केली. या संदर्भात ‘मर्दनगड संवर्धन समिती’ने याविषयी केलेल्या मागणीला यश आले. आता हा किल्ला अधिसूचित होणार, म्हणजे राजपत्रात (गॅझेटमध्ये) त्याची नोंद होणार आहे.

वास्कोचे भाजपचे आमदार कृष्णा उपाख्य दाजी साळकर यांनी फोंडा येथील ‘ऐतिहासिक मर्दनगडाचे संवर्धन आणि संरक्षण करावे’, अशी मागणी करणारा खासगी ठराव विधानसभेत मांडला. या ठरावाला ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ पक्षाचे आमदार वीरेश बोरकर, नावेलीचे भाजपचे आमदार उल्हास तुयेंकर, डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रियोळचे भाजपचे आमदार गोविंद गावडे, मडगावचे भाजपचे आमदार दिगंबर कामत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पाठिंबा दर्शवला. पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी फोंडा येथील मर्दनगडाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी अधिसूचित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमदार कृष्णा साळकर यांनी त्यांचे विधेयक मागे घेतले.

ठराव मांडतांना आमदार कृष्णा साळकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी धर्म अन् संस्कृती यांच्या रक्षणासाठी महान कार्य केले आहे. गोव्यातील मंदिरांचे कळस आणि हिंदूंच्या दारापुढील तुळस, हे दोन्ही महाराजांमुळेच आज सुरक्षित आहे. हे कार्य पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी मर्दनगडाचे संवर्धन आणि संरक्षण होणे आवश्यक आहे. मर्दनगडाच्या संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. गडाची जागा सध्या वन खात्याच्या नावावर आहे, ती प्रथम पुरातत्व खात्याच्या नावावर करून घ्यावी. मर्दनगडाची सविस्तर माहिती मिळवून किल्ल्याचे पुनर्बांधकाम करावे. गोव्यात ‘किल्ला विकास प्राधिकरण’ स्थापन करून यामध्ये काब-द-राम, बेतुल आदी सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करावे. या प्राधिकरणामध्ये इतिहासकार, जाणकार यांचा समावेश करावा.’’

आमदार वीरेश बोरकर, आमदार उल्हास तुयेकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार गोविंद गावडे आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही ठरावाला पाठिंबा देतांना मर्दनगडाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. आमदार गोविंद गावडे यांनी या वेळी स्व. विष्णु वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्यात आगमन झाल्याविषयीचा रचलेला पोवाडा गायला. त्यास उपस्थित आमदारांनी बाके वाजवून दाद दिली.

ठरावाला उत्तर देतांना मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘फोंडा येथील मर्दनगड हा धर्मवीर संभाजी महाराज यांनी स्वत: बांधला होता. हा किल्ला धर्मवीर संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळेच गोव्यात हिंदूंच्या क्रूर धर्मांतराला आळा बसू शकला. या किल्ल्याच्या ठिकाणी मी ७ ऑगस्ट या दिवशी भेट दिली असता हा किल्ला पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याचे दिसून आले आणि यामुळे खंत वाटली.’’ फळदेसाई यांनी मर्दनगडाचा सविस्तर इतिहास सांगितला.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘मर्दनगडावर जाणारा रस्ता करण्यासाठी आम्ही जागा देण्यास सिद्ध आहोत. मर्दनगडाचे संवर्धन करतांनाच तेथे धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा असलेले स्मारक उभारावे, तसेच बोरी येथील सिद्धनाथ पर्वत, मर्दनगड आणि फर्मागुडी येथील किल्ला या ठिकाणी ‘केबल स्टे’ (केबलवर आधारित) योजना आणावी.’’


मंत्री सुभाष फळदेसाई ठरावाला उत्तर देतांना म्हणाले, ‘‘फोंडा येथील मर्दनगडाला पुढे कुणीही एखादी गोष्ट म्हणून समजू नये; कारण या गडाविषयी गोमंतकीय इतिहास पांडुरंग पिसुर्लेकर, खुद्द पोर्तुगीज दस्तऐवज, शिवचरित्र आदी अनेक ठिकाणी माहिती उपलब्ध आहे.


आमदार कृष्णा साळकर यांनी ठराव मांडतांना मर्दनगडाविषयीची माहिती सर्वांसमोर आणल्याबद्दल ‘मर्दनगड संवर्धन समिती’चे अभिनंदन केले.


मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार उल्हास तुयेंकर आणि आमदार गोविंद गावडे यांनी ठरावावर मराठीतून भाषण केले.