सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) – म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या रथोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हसवडमध्ये कोरडा दिवस (‘ड्राय डे’) घोषित केला होता; मात्र स्थानिक देशी मद्य विक्री दुकानदार अन् खासगी मद्य विक्री दुकानदार यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मद्य विक्री चालूच ठेवली. ‘या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी काय करत होते ?’, असा संतप्त प्रश्न भाविकांतून उपस्थित केला जात आहे. (संबंधितांची चौकशी करून कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)
आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनुमाने ५ लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ रथोत्सव पार पडला. यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन यात्रेच्या मुख्य दिवशी सातारा जिल्हाधिकार्यांनी मद्य विक्रीसाठी निर्बंध घातले होते; मात्र यात्रेच्या मुख्य दिवशी अनेक ठिकाणी राजरोसपणे मद्यविक्री चालूच होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी म्हसवड येथे तळ ठोकून होते; मात्र तरीही स्थानिक ‘परमिट रूम’, बार आणि मद्य विक्रीची दुकाने चालूच होती. काही दुकानदारांनी तर दुकाने बंद ठेवून दुकानांपुढील अंगणामध्ये मंडप घालून मद्यविक्री चालूच ठेवली होती.
यात्रा सुनियोजनाच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना मद्यविक्रीवरील निर्बंधांविषयी शहरातील मद्यविक्री करणार्यांना पत्र देण्यास सांगितले होते. तसे पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संबंधितांना देण्यात आले होते; मात्र तरीही मद्यविक्री चालूच होती. याविषयी अधिकार्यांना विचारले असता त्यांनी कुठेही मद्यविक्री होत नसल्याचे प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले; मात्र संबंधित अधिकार्यांना याविषयीचे व्हिडिओ दाखवल्यावर त्यांनी याविषयी चौकशी करण्याचे आश्वासन माध्यमांना दिले. |