उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवेदन
कोल्हापूर, २ डिसेंबर (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने चालू झाले आहेत; मात्र अद्याप या कारखान्यांनी ऊसदर घोषित केलेला नाही. यामुळेे शेतकर्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर तातडीने घोषित करावा आणि या संदर्भात कारखान्यांना सूचना देण्यासाठी संयुक्त बैठक बोलवावी, अशा मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, सुरेश चौगले, युवराज पोवार, बाबासाहेब पाटील, हर्षल पाटील, राजू रेडेकर, सुरज डावरे यांसह अन्य उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून चालू झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी किमान मूल्यदराप्रमाणे ऊसदर निश्चित करून तो वर्तमानपत्राच्या माध्यमातून घोषित करणे आवश्यक आहे. हा नियम असतांना कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी तसे केलेले नाही. परिणामी उसाला किती दर मिळणार, याची माहिती नसतांनाही केवळ कारखान्यांवर विश्वास ठेवून शेतकरी ऊस पुरवठा करत आहेत. कारखान्यांकडून अद्याप दराची स्पष्टता नसल्याने शेतकरी अंधारात आहे.