ईश्‍वरेच्‍छेने वागणार्‍या ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या श्रीमती विजयालक्ष्मी चव्‍हाण (वय ८८ वर्षे) !

श्रीमती विजयालक्ष्मी चव्‍हाण

१. ‘देवद आश्रमातील चव्‍हाणआत्‍यांचे रहाणीमान स्‍वच्‍छ आणि नीटनेटके आहे. 

२. ईश्‍वरेच्‍छेने वागणे 

अलीकडच्‍या काही मासांमध्‍ये चव्‍हाणआत्‍यांचे मन एखाद्या लहान बाळासारखे झाले आहे. काही वेळा त्‍यांना भूक लागलेलीही कळत नाही. ‘त्‍या ईश्‍वरेच्‍छेने वागतात’, असे लक्षात येते.

३. सेवेची आवड 

आत्‍यांचे वय आता ८८ वर्षे आहे; पण त्‍या आश्रमातील भोजनकक्ष, तसेच बांधणीसेवा करतात, त्‍या ठिकाणी स्‍वतंत्रपणे फिरतात. त्‍या १ – २ घंटे सेवा करतात आणि ती सेवा चांगल्‍या प्रकारे करतात.

सौ. जयमाला पडवळ

४. साधकांनी गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करावी ! 

चव्‍हाणआत्‍यांच्‍या बोलण्‍यात मला चैतन्‍य जाणवते. त्‍या म्‍हणतात, ‘‘आपल्‍याला ‘काय हवे आणि काय नको ?’, हे त्‍या भगवंताला ठाऊक असते. ‘स्‍वतःला कोणते अन्‍न हवे आणि त्‍या अन्‍नातून किती चैतन्‍य मिळणार आहे ?’, याचे नियोजन भगवंताने आधीच केलेले असते. गुरुदेवांनी चैतन्‍य पुरवल्‍यामुळे आपण जिवंत आहोत’, अशी कृतज्ञता साधकांनी व्‍यक्‍त करावी !’’

५. आत्‍यांनी सकारात्‍मक आणि साधनेला धरून बोलणे अन् त्‍यांचे मन निर्मळ असणे 

आत्‍यांचे बोलणे नेहमी साधनेला धरूनच असते. त्‍या ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ॥’ हा नामजप सतत करतात. आत्‍या जे काही बोलतात, ते नेहमी सकारात्‍मकच असते. तेव्‍हा माझ्‍या मनात विचार येतात, ‘देवा, यांचे मन किती निर्मळ आहे. आपण म्‍हणतो, ‘जीवनाच्‍या अंतिम टप्‍प्‍याला मनुष्‍याचे मन निर्मळ हवे !’ याचे सुंदर उदाहरण म्‍हणजे चव्‍हाणआत्‍या !’

हे भगवंता, मला शिकण्‍यासाठीच चव्‍हाणआत्‍यांच्‍या सत्‍संगात त्‍यांच्‍या खोलीतच मला रहायला दिलेस. त्‍यासाठी तुझ्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते !’

– सौ. जयमाला पडवळ (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.८.२०२४)