दीपावली विशेष !
पती-पत्नीच्या प्रेमाची साक्ष देणारा, नात्यातील प्रेम फुलवणारा दीपावलीत येणारा पाडवा वैवाहिक जीवनातील आनंद वृद्धींगत करतो. हिंदूंचे सण जसे चैतन्यदायी, निसर्गानुकुल आहेत, तसेच ते नात्यातील गोडवा वाढवणारे, आप्तस्वकियांतील संबंध दृढ करणारे आहेत. हिंदु धर्मात पत्रिका पाहून विवाह निश्चित करण्याची पद्धत आहे. ‘जीवनप्रवासात पती-पत्नींनी एकमेकांना अनुरूप होत जाऊन हा भवसागर पार करावा’, अशी विवाहामागची उदात्त संकल्पना आहे. मायेत राहून हळूहळू मायेपासून अलिप्त होण्यास शिकवणारी हिंदु धर्मातील आश्रम संकल्पना ही मनुष्याच्या प्रकृतीनुसार त्याला भगवंताशी एकरूप व्हायला शिकवते. एकमेकांना समजून घेऊन, त्यागाच्या प्रेरणेने भरलेले आणि अपेक्षाविरहित वैवाहिक जीवन निरपेक्ष प्रीती वाढवू शकते.
आज छोट्या कुटुंबपद्धतीच्याही पुढे जाऊन ‘लिव्ह इन’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहाण्याची पद्धत आली आहे. एकटे रहाण्याची पद्धतही भारतात चालू झाली आहे. घटस्फोटांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. या संदर्भात नुकतेच एका महिला अधिवक्त्याने सांगितले, ‘‘माझ्याकडे एक घटस्फोटाचे प्रकरण आले होते, त्यांना मी विवाहाच्या वेळी होणार्या ‘सप्तपदी’चा अर्थ वाचायला दिला. त्यानंतर त्यांच्यातील मतभेद दूर झाले.’’ हे भारतीय विवाहविधींचे महत्त्व आहे. नुकतेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही असे म्हटले होते, ‘‘अलीकडे छोट्याशा कारणानेही जोडपी विभक्त होतात.’’ काळानुसार संवेदनशीलता, नात्यांचे महत्त्व, त्यागाचे महत्त्व, प्रेमभाव, सहनशीलता, श्रद्धा या गोष्टी अल्प होत चालल्याने आणि मुली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्यानेही त्या सहजपणे टोकाचे पाऊल उचलू शकतात. अनेकांच्या दृष्टीने विवाहबाह्य संबंध हीसुद्धा आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. सध्या याचे प्रमाण ६० टक्के असल्याचे सांगितले जाते. परस्त्रीकडे मातेसमान पहाण्याची शिकवण देणार्या आणि प्रभु श्रीरामांना आदर्श मानणार्या संस्कृतीसाठी ही लज्जास्पद स्थिती आहे.
पती-पत्नीचा स्वभाव, प्रकृती, गुण-दोष, प्रारब्ध, त्यांचे एकमेकांशी असणारे देवाण-घेवाण हिशोब यांनुसार त्यांच्या नात्यात कटुता येऊ शकते. सर्वच नात्यांत ती न्यूनाधिक प्रमाणात असतेच; परंतु या सर्वांवर मात करून एकमेकांना समजून घेऊन त्याग आणि आदराची भावना वाढवून नात्यातील प्रेम टिकवणे शक्य होते. ‘पती-पत्नी हे एकमेकांसमवेतचे देवाण-घेवाण संपवण्यासाठी एकत्र आलेले असतात’, असे शास्त्र सांगते. विवाहाचा उद्देशच ‘जोडीदारासमवेतचा जीवनप्रवास देवाकडे जाण्यासाठी करायचा आहे’, हे लक्षात ठेवून दोघांनी एकमेकांना साहाय्य केल्यास प्रत्येक दिन हा पाडवा होईल !
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.