‘डिजिटल फ्रॉड’पासून सदैव सावध रहा ! – ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन’चा ग्राहकांना सल्ला

प्रतिकात्मक चित्र

(‘फ्रॉड’ म्हणजे फसवणूक)

मुंबई – एखाद्या वस्तूची ऑनलाईन विक्री चालू झाली की स्वस्तात चांगली वस्तू विकत घेण्याकडे प्रत्येकाचा कल असतो; मात्र खोटी विज्ञापने दाखवून अनेक ‘हॅकर्स’ त्यांचे अधिकोष खाते रिकामे करू शकतात. अशा फसव्या गोष्टींना भुलून अनेक ग्राहक सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक हानी होऊन त्यांना मनस्ताप होऊ शकतो. म्हणूनच ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एन्.पी.सी.आय.)ने ग्राहकांना सण-उत्सव अधिक सुरक्षितपणे आणि आनंदाने पार पाडण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करतांना पुढील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

१. ‘ऑनलाईन वस्तूवरील किमतीवरील सवलतीची सूट (‘ऑफर’) केवळ २ घंट्यांकरिता’, ‘झटपट ‘ऑफर’ आणि अमर्यादित सूट’ अशा अनेक प्रलोभनांमुळे ग्राहकांकडून संबंधित आस्थापनाची (आस्थापन खोटे तर नाही ना ? इ.) विश्वासार्हता पडताळण्याविषयी दुर्लक्ष होऊ शकते, त्यामुळे अनोळखी विक्रेते आणि संशयास्पद आस्थापनांची चांगली माहिती असणे आपल्यासाठी पुष्कळ महत्त्वाचे आहे.

२. ऑनलाईन वस्तू विकत घेतांना आवश्यक नसलेल्या वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण करू नका; कारण यामुळे ऑनलाईन असणारी वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका वाढतो. खरेदीसाठी मॉल किंवा सार्वजनिक स्थळे येथील ‘वाय-फाय नेटवर्क’चा वापर करू नका. त्यामुळे तुमची ऑनलाईन आर्थिक माहिती ‘हॅकर्स’ना सहज मिळू शकते.

३. सणासुदीच्या काळात खरेदीचे प्रमाण वाढत असल्यामुळे आपण नक्की काय काय मागितले ( ‘ऑर्डर’ केले) आहे ? याची नोंद ठेवण्यात ग्राहकांकडून चूक होऊ शकते, यामुळे अनेक जण ‘फिशिंग स्कॅम्स’ला (मासे गळाला लागतात त्याप्रमाणे ग्राहकाला लुबाडण्याच्या घोटाळ्याला) बळी पडू शकतात. बनावट ‘डिलिव्हरी नोटिफिकेशन्स’ टाळण्यासाठी पैसे भरण्याच्या ‘लिंक’वर ‘क्लिक’ करण्यापूर्वी नेहमी दोनदा पडताळून पहा.

४. तुमच्या खात्यांवर साधे किंवा ‘डीफॉल्ट पासवर्ड’ (म्हणजे संबंधित आस्थापनाने ग्राहकाला पुरवलेला पहिला ‘पासवर्ड’ पालटून ग्राहकाने सुरक्षेसाठी स्वतः दुसरा घालयचा पासवर्ड) वापरण्यापासून वाचा; कारण यामुळे तुम्ही हॅकर्ससाठी निशाण्यावर येऊ शकता. प्रत्येक खात्यासाठी सशक्त आणि वेगळा पासवर्ड निर्माण करा; जेणेकरून तुमची सुरक्षा वाढेल.