‘श्री गुरूंच्या कृपेमुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सुमधुर वाणीत आपल्याला वर्ष २०१६ च्या नवरात्रीत प्रारंभ झालेला भक्तीसत्संग प्रत्येक गुरुवारी श्रवण करण्यास मिळत आहे. यंदा ७.१०.२०२४ या दिवशी भक्तीसत्संग प्रारंभ होऊन ८ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपण भक्तीसत्संगांचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सुमधुर वाणीत भक्तीसत्संग घेणे
साक्षात् भूदेवीचा अवतार असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सुमधुर वाणीत आपल्याला भक्तीसत्संग ऐकण्यास मिळत आहे. ज्याप्रमाणे श्री सरस्वतीदेवी तिच्या विणेची सुमधुर तार छेडते, त्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची मंजूळ वाणी सुमधुर जाणवते. ही वाणी सामान्य वाणी नसून ती देवीची दिव्य वाणी आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असल्यामुळे त्यांच्यामध्ये पुष्कळ आध्यात्मिक चैतन्य कार्यरत आहे. हे आध्यात्मिक चैतन्य त्यांचे विचार, वाणी आणि कृती यांतून साधकांकडे प्रक्षेपित होऊन त्यांना पुढीलप्रमाणे विविध प्रकारचे लाभ होत आहेत.
१ अ. अनेकांचा पूर्वी जागृत न होणारा भाव भक्तीसत्संग ऐकल्याने जागृत होणे : अनेक साधकांनी वर्षानुवर्षे साधना करूनही त्यांचा भाव जागृत होत नव्हता; परंतु भक्तीसत्संग ऐकल्यामुळे त्यातील दैवी चैतन्यामुळे साधकांच्या कुंडलिनीशक्तीचा प्रवाह अनाहतचक्राच्या ठिकाणी स्थिर होण्यात येणारा अडथळा दूर झाला. त्यामुळे भक्तीसत्संग ऐकल्याने अनेकांची पुष्कळ प्रमाणात भावजागृती होत आहे. ‘गुरुकृपायोगानुसार करायच्या अष्टांग साधनेतील ‘भावजागृती होणे’ हे एक महत्त्वाचे अंग येथे साधले जात आहे.
१ आ. साधकांना चैतन्य मिळून त्यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होऊन त्यांना आपत्काळाला सामोरे जाण्याचे आध्यात्मिक बळ मिळणे : सध्या आपत्काळ चालू आहे. त्यामुळे साधकांवर पाताळातील मोठ्या वाईट शक्ती विविध प्रकारे आक्रमणे करून साधकांना त्रास देत आहेत. त्यामुळे बर्याच साधकांच्या केवळ देहावरच नव्हे, तर ते वापरत असलेल्या वस्तू, रहात असलेली वास्तू आणि वापरत असलेले वाहन यांच्यावरही पुष्कळ प्रमाणात त्रासदायक (काळ्या) शक्तीचे दाट आवरण आलेले असते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सुमधुर आणि चैतन्यमय वाणीत भक्तीसत्संग ऐकल्यामुळे अनेक साधकांना पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळून त्यांच्यावरील अन् त्यांच्याशी संबंधित वस्तू, वास्तू आणि वाहन यांच्यावरीलही त्रासदायक आवरण नष्ट होऊन साधकांमध्ये चैतन्य कार्यरत झाले आहे. भक्तीसत्संगातून प्रक्षेपित होणार्या ज्ञानमय चैतन्यामुळे साधकांवर आध्यात्मिक उपाय होऊन त्यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होऊन त्यांच्यामध्ये आपत्काळाला सामोरे जाण्याचे आध्यात्मिक बळ मिळाले आहे.
१ इ. साधकांमध्ये प्राथमिक टप्प्याला श्रवणभक्ती आणि उच्चतम टप्प्याला दास्यभक्ती अन् सेवकभाव जागृत होणे : सातत्याने भक्तीसत्संग ऐकल्यामुळे प्राथमिक टप्प्याला साधकांमध्ये सद्गुरूंचे मार्गदर्शन ऐकल्याने श्रवणभक्ती कार्यरत झाली. त्यानंतर ‘आठवडाभर भावजागृती होण्यासाठी कोणते प्रयत्न करायचे ?’, हे ध्येय दिले जाते. त्यामुळे एका भक्तीसत्संगातून पुढील भक्तीसत्संगापर्यंत साधकांचे संपूर्ण लक्ष दिलेल्या ध्येयावर केंद्रित होऊन त्यांच्या साधनेला दिशा मिळते. अशा प्रकारे साधकांची वृत्ती अंतर्मुख होऊन त्यांच्याकडून श्रवण केलेल्या सूत्रांनुसार आचरण होऊ लागल्याने त्यांच्यावर भगवंताची आणखी कृपा होते. त्यामुळे त्यांच्यातील श्रवणभक्तीचे रूपांतर दास्यभाव, सेवकभाव आणि दास्यभक्ती यांमध्ये झालेले आहे.
१ ई. साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेला दिशा मिळून त्यांच्या साधनेला गती मिळणे अन् अनेकांची आध्यात्मिक उन्नती होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सुमधुर आणि चैतन्यमय वाणीतील भक्तीसत्संगातून श्रीविष्णूच्या इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तिन्ही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे या ‘इच्छाशक्तीमुळे’ हे भक्तीसत्संग ऐकणार्या साधकांच्या मनात साधनेचे प्रयत्न वाढवण्याची इच्छा जागृत होते. ‘क्रियाशक्तीमुळे’ साधकांना भक्तीसत्संगात जे शिकायला मिळते, त्यानुसार कृती करण्यासाठी ते उद्युक्त होतात. तसेच ‘ज्ञानशक्तीमुळे’ साधकांना सेवा अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी आतून योग्य विचार स्फुरतात, तसेच अनुभूतीजन्य ज्ञानाचीही प्राप्ती होते.
१ उ. काळानुसार व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासंदर्भात सर्वाेत्तम मार्गदर्शन मिळाल्याने साधनेला गती येऊन आध्यात्मिक उन्नती होणे : ‘काळानुसार व्यष्टी आणि समष्टी साधना कशी करायला हवी ?’, याचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे गेल्या ८ वर्षांमध्ये सनातनचे भारतातील विविध ठिकाणचे आश्रम आणि प्रसार येथील साधकांच्या व्यष्टी अन् समष्टी साधनेला दिशा मिळून त्यांच्या साधनेला गती मिळाली आहे.
१ ऊ. साधनेला चालना मिळाल्याने अनेक जिवांचा ईश्वरी कार्यातील सहभाग वाढणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सुमधुर आणि चैतन्यमय वाणीतील भक्तीसत्संग ऐकल्यामुळे केवळ साधकच नव्हे, तर जिज्ञासू, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक, हितचिंतक, अर्पणदाते आणि धर्माभिमानी यांच्यामध्येही आंतरिक परिवर्तन होऊन त्यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेतील सहभाग आधीपेक्षा पुष्कळ प्रमाणात वृद्धींगत झालेला आहे.
२. भक्तीसत्संगामुळे झालेले अन्य आध्यात्मिक लाभ
२ अ. अष्टदेवतांची कृपा संपादन होणे : भक्तीसत्संगात वर्षभरात येणार्या विविध देवतांच्या सणांविषयी अत्यंत भक्तीमय माहिती सांगितली जाते, उदा. जन्माष्टमीच्या वेळी श्रीकृष्ण, गणेशोत्सवात श्रीगणेश, नवरात्रीत देवी, महाशिवरात्रीला शिव इत्यादी. त्यामुळे साधकांची श्रद्धा केवळ त्यांच्या उपास्य देवतेपुरती मर्यादित न रहाता ‘शिव, श्रीगणेश, दत्तगुरु, श्रीराम, श्री हनुमान, श्रीकृष्ण, श्री दुर्गादेवी आणि श्री महालक्ष्मीदेवी’ या अष्टदेवतांप्रती वाढते. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संस्थांच्या माध्यमातून चालू असलेल्या श्रीविष्णूच्या धर्मसंस्थापनेच्या अवतारी कार्याला अष्टदेवतांचे कृपाशीर्वाद मिळतात. त्यामुळे साधकांना केवळ एका उपास्यदेवतेची अनुभूती न येता अष्टदेवतांची अनुभूती येते. हे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी संबंधित साधकांचे वैशिष्ट्य आहे.
२ आ. अष्टसात्त्विक भाव जागृत होणे : भक्तीसत्संगाच्या श्रवणामुळे अनेकांचा भाव जागृत होऊन त्यांना साधनेतील आनंद मिळत आहे. जेव्हा भक्त भगवंताचे अस्तित्व चैतन्याच्या स्तरावर अनुभवत असतो, तेव्हा त्याला अत्याधिक प्रमाणात आनंद होऊन तो आठ प्रकारे व्यक्त होतो. यालाच ‘अष्टसात्त्विक भाव जागृत होणे’, असे म्हणतात. हे अष्टसात्त्विक भाव पुढीलप्रमाणे आहेत.
१. स्वेद (घाम येणे)
२. स्तंभ (कुंठित होणे, थांबणे, थक्क होणे)
३. रोमांच येणे
४. स्वरभंग होणे (स्वर गदगदणे)
५. कंप येणे
६. वैवर्ण्य (वर्ण, रंग पालटणे)
७. अश्रू वाहणे
८. आनंदावस्थेत मूर्च्छा येणे (बेशुद्ध होणे)
(सौजन्य : भक्तीकोष)
अशा प्रकारे अनेक साधकांचा अष्टसात्त्विक भाव भक्तीसत्संग ऐकत असतांना किंवा एखाद्या साधकाची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर किंवा कुणी संतपद प्राप्त केल्यावर जागृत होतो.
२ इ. अष्टांगयोगरूपी अष्टदल कमळ उमलणे : हे भक्तीसत्संग ऐकत असतांना ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग आणि प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)’, या गुरुकृपायोगांतर्गत येणार्या अष्टांगयोगांनुसार साधकांची साधना होऊन त्यांच्या व्यष्टी साधनेचा पाया भक्कम होतो. त्याचप्रमाणे त्यांना समष्टी साधनेसाठी आवश्यक असणारा समष्टीभाव वाढणे, सांघिकभाव वाढणे, नेतृत्वगुण वाढणे, सेवेचे योग्य नियोजन करणे, अचूक निर्णयक्षमता वाढणे इत्यादींची वृद्धी होत आहे. तसेच भक्तीसत्संगामुळे गुरुकृपायोगांतर्गत असणार्या अष्टांगयोगरूपी अष्टदल कमळ उमलत आहे.
३. कृतज्ञता
‘आम्हाला भक्तीसत्संगाच्या माध्यमातून भक्तीरस चाखवणार्या आणि ज्ञानामृताचे पान करण्यास देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी लक्ष लक्ष भक्तीसुमने अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याची वेळ आणि टंकलेखन करण्याची वेळ २०.९.२०२४ सकाळी ११.ते ११.४५)
भक्तीसत्संगे उमलले, भक्तीरूपी अष्टदलकमल ।
भक्तीसत्संगाच्या ‘अष्टवर्षपूर्ती’निमित्त श्री गुरूंच्या चरणी वाहिलेली काव्य कृतज्ञतांजली !
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रेरणेनेच वर्ष २०१६ मध्ये राष्ट्रीय भाववृद्धी सत्संगांना आरंभ झाला. त्या भावसत्संगरूपी बिजाचे आता भक्तीसत्संगात परिवर्तन होऊन साधकांच्या जीवनात भक्तीवृक्ष बहरला आहे. गेली ८ वर्षे या भक्तीसत्संगांच्या माध्यमातून श्री गुरूंनी समस्त साधकांना जे अनमोल भक्तीधन दिले आहे, त्याचे आज भक्तीसत्संगाच्या ‘अष्टवर्षपूर्ती’निमित्त अवलोकन करतांना श्री गुरुकृपेने मला काव्याच्या पुढील ओळी स्फुरल्या. या काव्यरूपी कृतज्ञतापुष्पांची ओंजळ भरून मी ती श्री गुरूंच्या चरणी भक्तीभावे समर्पित करत आहे.
श्री गुरूंनी शिकवली साधना अष्टांग।
भक्तीसत्संगाने भारित केले भक्तीने अंतरंग ।। १ ।।
भक्तीसत्संगातील चैतन्याने भारित होती अष्ट दिशा ।
प्रकाशले सारे वातावरण अन् दूर झाली अंतरातील निशा (टीप) ।। २ ।।
हरूनी ‘अष्टदारिद्र्य’ भक्तीद्वारे, प्रदान होती ‘अष्टसिद्धी’ ।
अष्टौप्रहर अनुसंधाने, होई आता जलद भक्तीची वृद्धी ।। ३ ।।
भक्तीसत्संगामुळे साधकांसी लाभे, कृपा अष्टदेवतांची ।
सर्व तत्त्वे सामावली ज्यांच्यात, ही लीला त्याच गुरुदेवांची ।। ४ ।।
भक्तीसत्संगे उमलले, भक्तीरूपी अष्टदलकमल ।
साधकहृदयी प्रतिस्थापित झाले, श्री गुरूंचे चरणकमल ।। ५ ।।
श्री गुरुकृपेनेच होई आता, भक्तीसत्संगाची अष्टवर्षपूर्ती ।
गुरुवरा, तव चरणी कृतज्ञता व्यक्त करू मी किती ।। ६ ।।
हे गुरुराया, कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।
अनंत कोटीशः कृतज्ञता गुरुवरा, अनंत अनंत कोटीशः कृतज्ञता ।। ७ ।।
टीप – निशा : साधकांच्या मनातील निराशा आणि नकारात्मक विचार यांच्या रूपातील अंधकार.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (२६.९.२०२४)
|