‘सागरी किनारा स्वच्छता’ अभियान ही सवय व्हावी ! – सी.पी. राधाकृष्णन्, राज्यपाल

उजवीकडून दुसऱ्यास्थानी सी.पी. राधाकृष्णन्

मुंबई – प्रत्येक मोठ्या कार्याचा प्रारंभ लहान गोष्टींतूनच होतो. सागरी किनारा स्वच्छतेच्या जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेचा प्रारंभ मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

सागरी किनारा स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी व्हावी, यासाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी ‘आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिना’चे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्रालय, श्रम आणि रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारा येथे २१ सप्टेंबर या दिवशी स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांसह प्रशासकीय अधिकारी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

समुद्रकिनार्‍यांच्या स्वच्छतेचे दायित्व प्रत्येकाचे ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगभरातील पर्यटक महाराष्ट्रातील स्वच्छ किनार्‍यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याचे दायित्व प्रत्येकाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘स्वच्छ भारत’ अभियान चालू केले आहे. राज्यातही ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचा शुभारंभ झाला आहे. राज्यात ४ सहस्र ५०० ठिकाणी अभियान राबवण्यात येणार आहे.