नागपूर येथील सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका

मंदिराच्या नावाने खोटे दाखले वापरल्याचा आरोप !

संदीप जोशी

नागपूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. निविदा काढण्यासाठी मंदिराच्या नावाने खोट्या दाखल्यांचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आंभोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ११५ कोटी रुपयांच्या निविदेत पात्र ठरण्यासाठी १२१ कोटी रुपयांची निविदा ‘शक्ती बिल्डकॉन’ला देण्यासाठी खटाटोप करण्यात आला. जोशी अध्यक्ष असलेल्या श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे खोटे अनुभव प्रमाणपत्र सिद्ध करून ते सार्वजनिक बांधकाम विभागात सादर केले आणि ११५ कोटी रुपयांची निविदा १२१ कोटी रुपयांमध्ये मिळवून दिली. या भ्रष्टाचारात आणखी लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

याविषयी सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी म्हणाले की, मोहनीश जबलपुरे यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. कोणत्याही संस्थेत काम केलेल्या व्यक्तीला अनुभव प्रमाणपत्र देण्यात येते. तसे मीही दिले आहे. त्यात काही गैर नाही. माझ्या सार्वजनिक जीवनात कोणताही गैरप्रकार कधी केलेला नाही.