श्रावण सोमवार निमित्त….
मंदिरातील शिवपिंडीजवळ श्री गणेशमूर्ती
सांगली-मिरजचे संस्थानिक सरदार पटवर्धन घराण्याचे कुलदैवत श्री गणपति असल्याने शिवलिंग आणि श्री गणेशमूर्ती एकत्र आहेत.
संकलन – श्री. सचिन कौलकर, मिरज (जिल्हा सांगली)
उत्तरप्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिर या मंदिराप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील मिरज येथील ब्राह्मणपुरीमधील समस्त भक्तजनांचे श्रद्धास्थान असलेले ऐतिहासिक ‘श्री काशीविश्वेश्वर मंदिर’ हे जागृत असे शिवमंदिर आहे. उजव्या सोंडेचा गारेचा उभा गणराज आणि श्री काशीविश्वेश्वराचे पूर्वाभिमुखी शिवलिंग या वैशिष्ट्यांमुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे पुरातन मंदिर मराठेकालीन स्थापत्य शैलीमध्ये बांधले असून त्याची उभारणी अनुमाने २५० वर्षांपूर्वी वर्ष १७७३ च्या सुमारास पटवर्धन जहागिरीचे सरदार राजश्री मोरोबल्लाळ पटवर्धन यांनी केली. त्यांचे समाधीस्थान या मंदिराच्या प्रांगणात मागील बाजूस आहे.
पेशव्यांच्या दरबारातील मातब्बर सरदार मोरोबल्लाळ पटवर्धन !
मिरज येथील पटवर्धन राजघराण्याचे मूळपुरुष प.पू. ब्रह्मीभूत हरभटबाबा पटवर्धन यांचे नातू भूतपूर्व मिरज संस्थानचे अधिपती आणि पेशव्यांचे प्रमुख सरदार दिवंगत श्रीमंत गोविंद हरि पटवर्धन यांचे पुतणे मोरोबाआबा उपाख्य मोरोबल्लाळ हे पेशव्यांच्या दरबारातील मातब्बर सरदारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कार्यकाळ अनुमाने वर्ष १७३२ ते १७७४ असा राहिला. हिंदवी स्वराज्याचे ‘दक्षिण दिग्पाल’ म्हणून ओळखल्या जाणार्या सरदार पटवर्धनांमध्ये एक महत्त्वाचे स्थान असणारे राजश्री मोरोबल्लाळ हे पेशव्यांच्या दरबारातील एक अत्यंत शूर, मुत्सद्दी आणि धुरंधर सरदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या मुत्सद्देगिरीचा उपयोग स्वराज्यकामी अनेक प्रसंगी झाला. त्यामुळेच पेशव्यांनी त्यांना साडेतीन वस्त्राचा विशेष बहुमान दिला होता. दक्षिणेतील अनेक लढायांमध्ये ते सहभागी झाले होते. वर्ष १७७१ मध्ये मिरज संस्थानचे अधिपती गोविंद हरि यांच्या मृत्यूनंतर सर्व पटवर्धन दौलतीचा कारभार मोरोबाआबा यांच्याकडे आला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पटवर्धन जहागिरीचे सुकाणू मोठ्या हिंमतीने हाकली. वर्ष १७७३ मध्ये त्यांची ‘सुवर्णतुला’ होऊन दान-धर्म करून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्याच वेळी काशीविश्वेश्वर मंदिर आणि अन्नछत्र यांची उभारणी येथे करण्यात आली आहे. वर्ष १७७४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ही समाधी बांधण्यात आली आहे.
मंदिराविषयी मान्यवरांचे अभिप्राय…
मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करतो ! – माधवराव गाडगीळ, भक्त, श्री काशीविश्वेश्वर देवालय
पेशवेकालीन श्री काशीविश्वेश्वर देवालय १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात सांगलीचे सरदार मोरोबल्लाळ पटवर्धन यांनी बांधले. या मंदिरामध्ये उजव्या सोंडेचा गणपति, पूर्वाभिमुख वालुकामय शिवलिंग आहे. गाभार्यासमोर पाषाणात बनवलेला नंदीही स्थापित केला आहे. पूर्वाभिमुख शिवलिंग असल्यामुळे या देवळात पूर्ण प्रदक्षिणा केली जाते. चातुर्मास, महाशिवरात्र, तसेच अनेक उत्सवांनिमित्त या मंदिरात सतत भजन, कीर्तन, प्रवचन, अखंड नाम सप्ताह, श्रीमद्भगवद्गीता पठण आणि अन्य अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करून ते उत्साहात साजरे केले जातात.’’
गुरव समाजातील सेवेकरी देवाची मनोभावे सेवा करतो ! – दत्तात्रय बाळकृष्ण गुरव, मंदिराचे गुरव (पुजारी)
पूर्वाभिमुख शिवलिंगावर ठराविक दिवशी सूर्यकिरण पडतात. त्या दिवशी येथे किरणोत्सव साजरा केला जातो. श्री गणपति आणि शिवलिंग यांचे एकाच वेळेला नंदीच्या शिंगावरून शृंगदर्शन केले जाते. प्रतिदिन पहाटे ४.३० वाजता येथे पूजाअर्चा केली जाते. आम्ही सर्व गुरव समाजातील सेवेकरी देवाची मनोभावे सेवा करतो.
मंदिरात सेवा केल्यानंतर मला आनंद मिळतो ! – विनायक भोसले, सेवेकरी
या मंदिरात प्रतिदिन मंदिराची स्वच्छता आणि इतर सेवा करणारे सेवेकरी श्री. विनायक भोसले म्हणाले, ‘‘मी गेल्या १२ वर्षांपासून मंदिरात सेवा करत आहे. मला येथे सेवा केल्यानंतर आनंद मिळतो. मी कोणतीही अपेक्षा न करता सेवा करत आहे, तसेच मंदिरात सेवा केल्यानंतर माझ्या अडचणीही सुटल्या आहेत.’’
सरदार मोरोबल्लाळ पटवर्धन यांच्या भक्तीच्या प्रेरणेतून मंदिर साकारले आहे ! – किशोर पटवर्धन, विश्वस्त, श्री काशीविश्वेश्वर मंदिर, मिरज
माझे आजोबा मोरोबल्लाळ पटवर्धन हे मिरज संस्थानचे काही काळ अधिपती राहिले आहेत. वाराणसीला त्यांनी काही काळ मुक्काम केला आणि तेथे भक्ती केली. त्यांना भक्ती केल्यामुळे मिळालेल्या प्रेरणेतूनच त्यांनी हे मंदिर उभारलेले आहे. मंदिरात आम्ही ‘उपासना धामा’ची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी धर्मजागृतीचे बरेचसे कार्यक्रम होतात. प्रतिवर्षी महाशिवरात्रीला ३ दिवसांचा मोठा महोत्सव पार पाडला जातो. श्री काशीविश्वेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ‘माधवराव गाडगीळ मित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरात भजन, कीर्तन आणि अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होतात. सामुदायिक पठणाचे भरपूर कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. अपूर्व सोहळ्याची महाप्रसादाने सांगता होते. मंदिरात उजव्या सोंडेचा गारेचा उभा गणपति असून तो जागृत आहे. अशा प्रकारचे शिल्प अफगाणिस्तानात पहायला मिळते. तेथे ५ ते ६ सहस्र वर्षांपूर्वी पुरातन जुने शिल्प सापडले आहे. त्या शिल्पात आणि येथील गणपतीच्या मूर्तीत पुष्कळ साम्य आहे. हा एक वेगळा योगायोग आहे.