पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील कीर्ती विद्यालयातील क्रीडा शिक्षकाकडून १२ वर्षीय मुलीचे ४ वर्षे लैंगिक शोषण !

क्रीडा शिक्षक, मुख्‍याध्‍यापकांसह शाळेच्‍या विश्‍वस्‍तांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – निगडी येथील ‘ली. सोफिया एज्‍युकेशन सोसायटी’च्‍या ‘कीर्ती विद्यालया’तील पी.टी. शिक्षक (क्रीडा प्रशिक्षक) निवृत्ती काळभोर याच्‍या विरोधात १२ वर्षीय अल्‍पवयीन मुलीने तक्रार केली आहे. वर्ष २०२१ ते २१ ऑगस्‍ट २०२४ या कालावधीत पीडित मुलीला आरोपी काळभोर जाणीवपूर्वक वाईट स्‍पर्श करायचा. क्रीडा वर्गाला जातांना कंबर, तसेच पाठीवरून हात फिरवायचा. शाळेत येण्‍यास विलंब झाल्‍यास तो मारहाण करत असे. अनेकदा त्‍याने मुलीच्‍या अंतर्वस्‍त्रामध्‍ये हात घातल्‍याची माहिती पीडितेने सांगितली. गंभीर गोष्‍ट म्‍हणजे वर्ष २०१८ मध्‍ये याच शिक्षकाच्‍या विरोधात विनयभंगाचा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता. त्‍याने शाळेतील मुलीचा विनयभंग केला होता. न्‍यायालयाने त्‍याला शिक्षाही सुनावली होती. तरीही या शिक्षकाला ‘कीर्ती विद्यालया’ने पुन्‍हा नोकरीवर रुजू केले. (अशा वासनांध शिक्षकाला पुन्‍हा नोकरीवर घेणे हाच गंभीर गुन्‍हा शाळेकडून झाला आहे. तसेच पहिल्‍या गुन्‍ह्यात कठोर शिक्षा न झाल्‍याने गुन्‍हेगाराने पुन्‍हा दुसरा गुन्‍हा केला आहे ! – संपादक) या गुन्‍ह्यामध्‍ये अ‍ॅट्रॉसिटीसह बाल लैंगिक अत्‍याचाराचे कलम लावले आहे.

काळभोरसारख्‍या गुन्‍हेगाराला पुन्‍हा नोकरीवर घेणे म्‍हणजे एका पद्धतीने लैंगिक अत्‍याचारांच्‍या गुन्‍ह्यांना प्रोत्‍साहन दिल्‍यासारखे आहे. यावरून ‘कीर्ती विद्यालया’चे मुख्‍याध्‍यापक अशोक जाधव, ‘ली सोफिया एज्‍युकेशन ट्रस्‍ट’चे अध्‍यक्ष रोहिदास जाधव, लक्ष्मण हेंद्र, अरविंद निकम, गोरख जाधव, हनुमंत निकम आणि शुभांगी जाधव यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्‍यात आली आहे.

बदलापूरच्‍या घटनेने वाचा फुटली !

बदलापूरच्‍या घटनेनंतर अत्‍याचाराच्‍या विरोधात उसळलेली लाट पाहून पीडित मुलीने धारिष्‍ट्य करून ही गोष्‍ट वर्गशिक्षकांना सांगितली. गेली ४ वर्षे पीडित मुलगी अत्‍याचार सहन करत होती. ती कुणालाही काहीही बोलली नव्‍हती.

संपादकीय भूमिका

शिक्षण क्षेत्राला कलंक असलेले शिक्षक ! अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करायला हवी !