संपादकीय : भारताचा ‘गौरव’ !

‘गौरव’ (‘लाँग रेंज ग्लाइड बाँब’)

भारतीय वायुसेनेच्या सुखोई-३० ‘एम्.के.आय.’ या लढाऊ विमानातून ‘गौरव’ नावाच्या ‘लाँग रेंज ग्लाइड बाँब’ची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. ‘गौरव’ हा भारत सरकारच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर.डी.ओ.’ने) सिद्ध केलेला संपूर्ण भारतीय बनावटीचा १ सहस्र किलो वजनाचा ‘ग्लाइड बाँब’ आहे. या बाँबचे वैशिष्ट्य म्हणजे याला विमानासारखे पंख असून विमानाद्वारे त्याला सोडल्यावर १५० किलोमीटर अथवा त्यापेक्षा अधिक अंतर पार करून तो लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकतो. या बाँबला स्वत:ची ‘नेव्हिगेशन’ यंत्रणा (लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी लागणारी विशेष यंत्रणा) असल्याने ज्या ठिकाणी ‘फायटर जेट’, क्षेपणास्त्र, तसेच ‘ड्रोन’ पोचू शकत नाही, अशा ठिकाणी हा बाँब पोचू शकतो. भारत संरक्षण क्षेत्रात गत काही मासांमध्ये एका मागोमाग शिखरे पादाक्रांत करत असून हे प्रत्येक भारतियासाठी निश्चित अभिमानास्पद आहे ! या ‘ग्लाइड बाँब’मुळे सशस्त्र दलांची क्षमता वाढणार असून स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या देशाच्या प्रयत्नांतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

यातील एक विशेष महत्त्वाचे सूत्र म्हणजे याच्या निर्मितीत ‘अदानी डिफेंस’चाही समावेश आहे. त्यामुळे अशा प्रकारे देशासाठी अत्यावश्यक अशी महत्त्वपूर्ण उपकरणे जे सिद्ध करतात, त्या आस्थापनांची अपकीर्ती करून त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ यांच्यासारखी अमेरिकी आस्थापने कार्यरत आहेत, असेच म्हणावे लागेल.

लवकरच भारत ४३ सहस्र कोटी रुपये व्यय करून जर्मनी किंवा स्पेन यांच्याकडून ६ पाणबुड्या घेत आहे. भारतीय नौदलाच्या मागणीनुसार नवीन तंत्रज्ञान असलेल्या या पाणबुड्या १२ दिवस सतत पाण्याखाली राहू शकतील. या मागणीनुसार पुरवण्यात येणार्‍या पाणबुड्या आपल्याला ७ वर्षांनंतर मिळणार असून त्यातील ४५ टक्के रचना ही स्वदेशी असणार आहे. प्रत्येक वर्षी एकेक पाणबुडी आपल्याला मिळणार आहे. सध्या ‘तेजस’ हे ‘सुपरसॉनिक’ लढाऊ विमानांच्या श्रेणीतील सर्वांत लहान आणि हलके विमान आहे. ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने विकसित केलेले तेजस हे दुसरे सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे. ‘लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ असे ‘तेजस’ हे विमान वजनाने हलके आहे. बहुउपयुक्त असलेले हे विमान कोणत्याही हवामानात प्रभावी ठरू शकते. ‘तेजस’ या विमानाचे वेगळेपण, म्हणजे याला त्रिकोणी पंख आहेत. यात अत्याधुनिक रडार आणि संगणकीय प्रणाली आहेत. ‘तेजस’ हे हवेतून हवेत आणि हवेतून भूमीवर क्षेपणास्र सोडू शकते ! असे हे ‘तेजस’ लढाऊ विमान अमेरिका, चीन, फ्रान्स अशा प्रगत राष्ट्रांच्या लढाऊ विमानांच्या तोडीस तोड असल्याचे लष्कराच्या एका संयुक्त सरावात लक्षात आले.

पाकिस्तान आणि चीन अशा शत्रूंच्या असणार्‍या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक पाणबुड्या, ‘ब्राह्मोस’सारखी क्षेपणास्त्रे, ‘तेजस’ लढाऊ विमान अन् ‘ग्लाइड बाँब’ यांची अत्यावश्यकता आहे. इस्रायलने ज्या प्रकारे इराणमध्ये लपून बसलेल्या ‘हमास’च्या प्रमुखास क्षेपणास्त्राद्वारे अचूक वेध घेऊन ठार केले, त्याच प्रकारे भारतानेही काश्मीरवर सातत्याने आक्रमण करणार्‍यांच्या मागे ज्या आतंकवादी संघटना आहेत, त्यांच्या ठावठिकाणांचा शोध घेऊन त्यांना संपवण्यासाठी या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला पाहिजे !