होंडा, सुळकर्णा आणि कोडली येथील खाण क्षेत्रांचा ऑनलाईन लिलाव घोषित

ऑक्टोबरपासून गोव्यात पूर्णक्षमतेने खाण व्यवसाय चालू करण्याचे सरकारचे प्रयत्न

खाणींच्या ‘ई-लिलावा’च्या दुसर्‍या फेरीला सुरुवात

साठवून ठेवलेल्या खनिजाची निविदा काढण्यास सर्वाेच्च न्यायालयाकडून गोवा सरकारला अनुमती

पणजी – सर्वाेच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट या दिवशी एका निवाड्याद्वारे पूर्वी साठवणूक करून ठेवलेल्या खनिज मालाची निविदा काढण्यास गोवा सरकारला अनुमती दिली आहे.

पणजी, १३ ऑगस्ट (वार्ता.) – होंडा, सुळकर्णा आणि कोडली येथील एकूण ५२६ हेक्टर खाण क्षेत्राचा ई-लिलाव (ऑनलाईन लिलाव) सरकारने घोषित केला आहे. हा तिसर्‍या टप्प्यातील लिलाव आहे. निविदा कागदपत्रे खरेदी करण्यासाठी २४ सप्टेंबर, तर बोली (अंदाजे मूल्य) सादर करण्यासाठी ४ ऑक्टोबर २०२४ हा अंतिम दिनांक आहे. सरकारने पहिल्या २ टप्प्यांमध्ये ९ खनिज क्षेत्रांचा यापूर्वीच लिलाव केला आहे आणि यामधील ‘वेदांता’ आस्थापनाने डिचोली येथील खाण चालू केली आहे. अन्य खाण क्षेत्रांच्या निविदा जिंकलेली खाण आस्थापने पर्यावरणीय आणि अन्य अनुज्ञप्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात ऑक्टोबर २०२४ पासून गोव्यात खाण व्यवसाय वेगाने चालू होणार असल्याची घोषणा केली होती. सरकारने ‘डंप’ (‘डंप’ म्हणजे यापूर्वी उत्खनन करून साठवून ठेवलेला माल) धोरण सिद्ध केले आहे आणि पुढील १५ दिवसांत आणखी ५ खाण क्षेत्रांचा लिलाव करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले होते.

ई-लिलाव घोषित झालेल्या ३ खाण क्षेत्रांची माहिती

१. होंडा खाण क्षेत्र : सत्तरी तालुक्यातील होंडा येथे एकूण ६१.७३ हेक्टर क्षेत्र आहे. तेथे ५६ लाख ३२ सहस्र टन खनिजसाठा आहे आणि ४ लाख ५० सहस्र टन ‘डंप’ आहे. पूर्वी ही खाण चौगुले आस्थापनाकडे होती.

२. कुर्पे-सुळकर्णा खाण क्षेत्र : सांगे आणि केपे तालुक्यांमध्ये सुळकर्णा खाण क्षेत्राचे एकूण ८७.६४ हेक्टर क्षेत्रफळ आहे. तेथे ९७ लाख ९० सहस्र टन साठा, तर १ लाख ५७ सहस्र टन ‘डंप’ आहे. पूर्वी ही खाण ‘सेझा रिसोर्सिस लि.’ (पूर्वीची धेंपो अँड कंपनी) या आस्थापनाकडे होती.

३. कोडली खाण क्षेत्र : धारबांदोडा तालुक्यातील कोडली खाण क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ३७७.०८ हेक्टर आहे. तेथे ४ कोटी ८४ लाख ९० सहस्र टन खनिज साठा आहे. पूर्वी ही खाण ‘मेसर्स सोशियादाद तिंबलो’ आस्थापनाकडे होती.