भारताची प्रगती आणि विकास यांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्या ‘आय.आय.टी.’च्या १०० विद्यार्थ्यांची माहिती
(‘आयआयटी’ म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्था)
भारताची प्रगती आणि विकास यांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्या ‘आय.आय.टी.’च्या माजी विद्यार्थ्यांना मानवंदना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रसेवेसाठी समर्पित असे ‘100 Great IITian’s’ (१०० मोठे आयआयटीअन्स) हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. आय.आय.टी. खरगपूरचे माजी विद्यार्थी कमांडर व्ही.के. जेटली यांनी या पुस्तकाचे संकलन केले आहे. या पुस्तकातून ‘चांगल्या जीवनपद्धतीसाठी सुशिक्षित लोक स्थलांतर करतात, ही कल्पना दूर करणे’, हे या पुस्तकाचे ध्येय असून या पुस्तकात आय.आय.टी.चे ते विद्यार्थी ज्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मातृभूमीची सेवा करण्यासाठी भारतात राहिले, त्यांची यशोगाथा आहे.
४२९ पाने असलेल्या या पुस्तकामध्ये नंदन नीलकेणी, नारायण मूर्ती, मनोहर पर्रीकर आणि जे वर्ष २००० च्या आधी आय.आय.टी.मधून पदवीधर झाले अन् ज्यांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे, अशा नामवंत व्यक्तीमत्त्वांविषयी माहिती देण्यात आली आहे. या व्यक्तींनी जाणीवपूर्वक विदेशातील लाभदायक संधी सोडून विविध क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान दिले आहे.
१. माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासह गोव्यातील ३ विद्यार्थ्यांचा उल्लेख
या पुस्तकात माहिती दिलेल्या उल्लेखनीय आय.आय.टी. विद्यार्थ्यांमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचीही माहिती आहे. ते मुंबई येथील आय.आय.टी.चे माजी विद्यार्थी असून विदेशात त्यांना आकर्षक सवलती मिळत असतांना भारतात रहाण्याच्या ध्येयाला मूर्त स्वरूप देऊन ते राजकारण आणि शासन यांमध्ये दिलेल्या योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. गोवा हे लहान राज्य असूनही भारतातील महान १०० आय.आय.टी. विद्यार्थ्यांमध्ये ३ विद्यार्थी गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. गोव्याची लोकसंख्या मर्यादित असूनही या अपवादात्मक व्यक्तींनी राष्ट्रासाठी लक्षणीय योगदान दिले आहे.
या पुस्तकात उल्लेख असलेले गोव्यातील आणखी एक प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व म्हणजे अशांक देसाई ! ते मुंबई येथील आय.आय.टी.चे विद्यार्थी असून त्यांनी सर्वांत प्रथम भारतात आय.टी. (माहिती तंत्रज्ञान) उद्योग चालू केला, तसेच ते Mastek (मॅनेजमेंट अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड) आणि NASSCOM (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज) यांचे सहसंस्थापक आहेत. अगदी छोट्या प्रमाणात प्रारंभ करून त्यांनी शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करून एका यशस्वी सॉफ्टवेअर आस्थापनाची स्थापना केली. त्यांच्या या कामगिरीची पंतप्रधानांनी नोंद घेतली असून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करणे, शिक्षण देणार्या स्वयंसेवी संस्थांना साहाय्य करणे, तसेच समाजातील विशेष सुविधा मिळत नसलेल्या समाजातील समुदायांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणे, यांवर ते भर देत आहेत.
या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांमध्ये गोव्यातील व्यंकटेश प्रभुदेसाई हे एक आहेत. ते मुंबई येथील आय.आय.टी.चे माजी विद्यार्थी असून गोव्यातील शिक्षणाचे प्रवर्तक आहेत. ‘बी.टेक्.’ आणि ‘एम्.ई.’ या पदव्या मिळवल्यानंतर त्यांनी CSIR (काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंटस्ट्रीयल रिसर्च) च्या NAL (नॅशनल एरोस्पेस लेबोरेटरी) यामध्ये नोकरी केली आणि त्यानंतर गोव्यात ‘आर्यन स्टडी सर्कल’ चालू करून ‘मुष्टीफंड आर्यन उच्च माध्यमिक विद्यालया’ची स्थापना केली. शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांनी नैतिक मूल्ये आणि शिक्षणात प्रावीण्य मिळवून प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गोव्यातील विद्यार्थ्यांना सक्षम केले आहे.
२. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित माजी विद्यार्थी
‘१०० ग्रेट आयआयटीयन्स’ या पुस्तकात महाराष्ट्रातील पुढील व्यक्तींचा समावेश आहे.
नंदन नीलेकणी : हे ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक आणि ‘UIDAI – युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष असून आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.
नारायण मूर्ती : हे ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक असून आयआयटी कानपूरमधून पदवीधर झाले.
विनायक देशपांडे : हे ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक, आयआयटी मुंबईहून पदवीधर झाले.
मंगू सिंग : हे ‘देहली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’चे व्यवस्थापकीय संचालक असून आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी आहेत.
वाय्.सी. देवेश्वर : ‘आयटीसी (इंडियन टॉबेको कंपनी) लिमिटेड’चे माजी अध्यक्ष असून ते आयआयटी खरगपूरमधून पदवीधर झाले.
बी.के. सिंगल : विदेश संचार निगम लिमिटेड (VSNL) चे माजी अध्यक्ष असून आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी आहेत.
या व्यक्तींनी विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि पुस्तकात त्यांच्या कामगिरीसाठी ओळखले जातात.
३. भारताच्या विकासाविषयीच्या वचनबद्धतेला उत्तेजन देणे हा पुस्तकाचा उद्देश !
या पुस्तकात विद्यार्थ्यांची नावे घेतांना माजी विद्यार्थी संघटनेकडून सूचना घेण्यात आल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आव्हाने समोर असूनही उत्कष्ट कामगिरी केली, त्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. वाचकांना प्रेरित करणे, त्यांना न ऐकलेल्या महान व्यक्तींशी जोडणे आणि भारताच्या विकासाविषयीच्या वचनबद्धतेला उत्तेजन देणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे. या माजी विद्यार्थ्यांच्या कार्याला प्रसिद्धी देऊन वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने नेणे, यासाठी देशातील बुद्धीमत्तेला मान्यता देऊन पाठिंबा देण्यावर या पुस्तकात भर दिला आहे.
४. अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी वाचण्यासारखे पुस्तक !
या लेखकाच्या वचनबद्धतेप्रमाणे या पुस्तकावर मिळणार्या लाभातील १०० टक्के रक्कम समाजाच्या उन्नतीसाठी वापरण्यात येईल. यांपैकी ४० टक्के रक्कम २३ आय.आय.टी.मध्ये प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येईल. ४० टक्के रक्कम खरगपूर येथील आय.आय.टी. च्या परिसरात असलेल्या आदिवासी गावांचा विकास करण्यासाठी वापरण्यात येईल, १० टक्के रक्कम ‘पी.एम्. केअर’ निधीसाठी देण्यात येईल आणि १० टक्के रक्कम सामाजिक कार्य करणार्या संस्थांना देण्यात येईल. ‘100 Great IITian’s’ हे पुस्तक अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि ज्यांच्या हृदयात राष्ट्र उभारणीविषयीची भावना आहे, त्या सर्वांनी वाचणे आवश्यक आहे.
– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.