रायगड जिल्ह्यातील पनवेल रेल्वेस्थानक हे दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्यासारखे एक महत्त्वाचे जंक्शन आहे, तसेच गजबजलेल्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. पनवेल रेल्वेस्थानकामध्ये ७ फलाट (प्लॅटफॉर्म्स) असून अजून २ फलाटांचे बांधकाम चालू आहे. तेथे प्रतिदिन शब्दशः लक्षावधी लोक जा-ये करतात. असे असले, तरी तेथे प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे, ही वस्तूस्थिती आहे.
१. प्रवाशांच्या गैरसोयीचे खांब
जेव्हा आपण पनवेल रेल्वेस्थानकातून साई मंदिराच्या बाजूने बाहेर पडतो, तेव्हा मोठी कसरत करतच जावे लागते. प्रवाशांना जीव मुठीत धरूनच जावे लागते. रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी, तसेच रेल्वेस्थानकाबाहेर वाहनांची गर्दी होऊ नये; म्हणून रेल्वेने तेथे काही छोटे खांब लावले आहेत. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या सोयीसाठी म्हणून ते खांब लावले आहेत; पण या खांबांचा प्रवाशांना अधिक प्रमाणात त्रास होतांना दिसून येत आहे. जेव्हा प्रवासी व्यक्तीकडे अधिकचे सामान असते, तेव्हा या छोट्या खांबांतून सामान घेऊन बाहेर पडणे आणि लगेचच उभे असणारी रिक्शा अन् रिक्शाचालक यांची झुंड यांतून मार्ग काढणे, हे खरोखरच आव्हान म्हणून उभे रहाते. याचा वयस्करांना, तसेच दिव्यांग व्यक्तींना पुष्कळ त्रास होतो. याचा रेल्वे प्रशासनाने विचार करायला हवा. भविष्यात रेल्वेस्थानकावर काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर कुठल्याही सखोल विचारांअभावी उभारण्यात आलेले हे खांब साहाय्य पुरवण्यास निश्चितपणे अडथळा ठरतील; याचे कारण स्थानकामधून बाहेर पडल्यानंतर बरीच मोठी जागा विनावापर आहे. रेल्वेस्थानकापासून मुख्य मार्गापर्यंत पोचण्यासाठी जवळपास २०० मीटर चालत जावे लागते. या जागेनंतर हे खांब लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे खांब लावतांना प्रवाशांच्या सोयीचा विचार केला आहे कि नाही ? असाच प्रश्न पडतो.
२. रिक्शाचालकांची अरेरावी
साई मंदिराच्या बाजूला रिक्शाचालकांचीही अरेरावी मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळते. प्रवाशांना आपल्या रिक्शात बसवण्यासाठी चढाओढ करणे आणि कोणतीही शिस्त न पाळता कशाही प्रकारे रिक्शा चालवणे, हे तेथील नेहमीच दिसणारे चित्र आहे. मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करण्याचा मुद्दाही आहेच. सगळ्या रिक्शांना मीटर बसवले आहेत; पण मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही. ‘जर रिक्शाचालकांच्या मनाप्रमाणेच भाडे आकारले जाणार असेल, तर ते मीटर केवळ दिखाऊ (शो) म्हणून बसवले आहे का ?’, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच येतो.
या ठिकाणी असे लक्षात येते की, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (‘आर्.टी.ओ.’तील) एकही पोलीस कर्मचारी ही परिस्थिती हाताळण्यासाठी तेथे उपलब्ध नसतो. निदान गर्दीच्या वेळी तरी परिवहनच्या कर्मचार्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. या संदर्भात वेळीच जर अभ्यासपूर्ण उपाययोजना केली, तर भविष्यातील दुर्घटना टाळता येतील.
३. विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव
एकदा पनवेल रेल्वेस्थानकातून बाहेर पडतांना माझी साडी रिक्शामध्ये अडकून मला मोठी दुखापत होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; पण गुरुकृपेने ती टळली. मोठी दुखापत न होता थोडक्यात निभावले. यासंबंधी तक्रार करण्यासाठी मी स्थानकाच्या समोरच असलेल्या पोलीस ठाण्यात जाऊन ‘पोलिसांनी रिक्शाचालकांना नियंत्रित करावे’, असे सांगितले; पण त्यांनी ती परिस्थिती हाताळण्यास असमर्थता दर्शवली. ते म्हणाले, ‘‘हे आमचे काम नाही, तर परिवहन विभागाचे काम आहे. तुम्ही त्यांना संपर्क करा.’’ त्या वेळी एक सौजन्य म्हणून ते तेथील परिस्थिती पाहून गेले आणि त्यांनी रिक्शाचालकांना समज दिली एवढेच ! या संदर्भात परिवहन कार्यालयात भ्रमणभाषवरून संपर्क केला. त्यावर ते म्हणाले, ‘‘आम्ही तेथे काहीच करू शकत नाही. खांब काढणे, हे रेल्वे प्रशासनाचे काम आहे.’’ त्यांनीही समस्या सोडवण्यासाठी असमर्थतता दाखवली आणि उलट मलाच त्यांनी ‘तुम्हीच ही समस्या सोडवण्यासाठी काही तरी केले, तर बरे होईल’, असे म्हटले. या प्रसंगातून रेल्वे पोलीस, ‘आर्.टी.ओ.’वाले, आणि प्रशासन हे या परिस्थितीत पालट करण्यापेक्षा केवळ एकमेकांवर उत्तरदायित्व ढकलतात, हे दिसून आले. ‘प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, वेगवेगळे विभाग यांनी एकत्रितरित्या समन्वय साधून काम करणे आवश्यक आहे. त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करून प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात’, अशी जागरूक नागरिकांची मागणी आहे.
यावरून हेच लक्षात येते की, जर सध्याच्या व्यवस्थेत तळागाळातील (‘ग्राऊंड लेव्हल’च्या) छोट्या छोट्या निस्तरता येण्यासारख्या समस्याही वर्षानुवर्षे सोडवल्या जात नसतील, तर ‘स्मार्ट सिटी’, ‘आत्मनिर्भरता’ या संकल्पना केवळ कागदोपत्रीच ठरू शकतात ! ‘लाईफलाईन ऑफ द नेशन’ (Lifeline of the Nation – राष्ट्राची जीवनरेखा) हे भारतीय रेल्वेचे घोषवाक्य आहे. ही ‘लाईफलाईन’ प्रवाशांचे ‘लाईफ’ (जीवन) खरेचच सुखकर करणारी असावी; ना की प्रवाशांच्या ‘लाईफ’वर (जिवावर) उठलेली, एवढीच सर्वसामान्य प्रवाशांची अपेक्षा आहे.
– एक जागरूक महिला (२.८.२०२४)