धर्माचरण हाच स्वरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग !

आज प्रतिदिन हिंदु मुली आणि महिला यांच्यावर अत्याचार होत असल्याच्या बातम्या वाचण्यात येत आहेत. अगदी वृद्ध महिलाही सुरक्षित नाहीत. लव्ह जिहादच्या घटनांमध्ये अनेक हिंदु मुली फसत आहेत. सकाळी घराबाहेर पडलेली मुलगी सायंकाळी सुरक्षित परत घरी येईल, याची खात्री पालकांना देता येत नाही. पालक २४ घंटे स्वतःच्या मुलीसमवेत राहू शकत नाही आणि जरी राहिले, तरी ते आपल्या मुलीचे रक्षण कितपत करू शकतील, याविषयी साशंकता आहे. या सर्व स्थितीमध्ये धर्माचरण करणे, साधना म्हणून आपल्या उपास्यदेवतेचा अखंड नामजप करणे, हा स्वसंरक्षणाचा एकमेव मार्ग आहे. एखाद्याला याविषयी शंका निर्माण होईल की, हे कसे शक्य आहे ? तर यासाठी आपण इतिहासातील काही दाखले पाहूया…

श्री. योगेश जलतारे

१. असुरांच्या गराड्यात असूनही पावित्र्यामुळे सीतामातेचे रक्षण झाले !

त्रेतायुगामध्ये रावणाने सीतामातेचे अपहरण केले. त्या कालावधीत सीता श्रीलंकेमध्ये सर्व असुरांमध्ये एकटीच होती. त्या वेळी तिचे रक्षण कुणी केले ? याचा जर आपण अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येईल की, तिच्याकडे धर्माचे म्हणा किंवा रामनामाचे म्हणा बळ असल्यामुळे असुर तिचे काही बिघडवू शकले नाहीत.

आपण रामायणामध्ये तो प्रसंग पाहिला असेल की, जेव्हा जेव्हा रावण सीतेला भेटायला यायचा, तेव्हा सीतेच्या हातामध्ये गवताची एक काडी होती. ती काडी ती रावणाला दाखवत असे आणि रावण त्या काडीला घाबरत असे. ती गवताची काडी, म्हणजे साधेसुधे गवत नसून दर्भाचे गवत होते. दर्भ हे पवित्रतेचे, शुचितेचे, सात्त्विकतेचे प्रतीक आहे. याचा अर्थ रावण सीतेमधील सात्त्विकता आणि तिची शुद्धता यांना घाबरत असे. त्यामुळेच तो सीतेला स्पर्श करू शकला नाही. यावरून धर्माचरणाचे महत्त्व अधोरेखित होते.

२. द्वापरयुगात स्वतः भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या साहाय्याला धावून आला !

द्वापरयुगामध्ये द्युतामध्ये पांडव हरल्यावर द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तिने श्रीकृष्णाला हाक मारली. त्या वेळी लगेचच श्रीकृष्ण धावून आला आणि त्याने द्रौपदीला वस्त्र पुरवले. द्रौपदीही धर्माचरणाचे ज्वलंत प्रतीक होती, सती होती. तिच्यामध्येही शुद्धता, पवित्रता हे सगळे गुण असल्यामुळे आणि ती भगवान श्रीकृष्णाची निस्सीम भक्त असल्यामुळे भगवंत तिच्यासाठी वेळीच धावून आला.

३. कलियुगातही निर्दयी निजाम सरदारांपासून संत कान्होपात्रा यांच्या रक्षणासाठी विठ्ठलाने तिला स्वतःमध्ये सामावून घेतले !

कलियुगातील उदाहरण पहायचे झाल्यास आपल्याला संत कान्होपात्राचे उदाहरण पहाता येईल. जेव्हा निजामाचे सरदार कान्होपात्रेची अब्रु लुटण्यासाठी तिच्या मागे धावले, तेव्हा कान्होपात्रेने विठ्ठलाचा धावा केला. त्यासरशी विठ्ठलाने कान्होपात्रेला स्वतःमध्ये विलीन करून घेतले आणि निजामाच्या सरदारांपासून तिचे रक्षण केले.

४. सती अनसूयेच्या सत्त्वपरीक्षेतून त्रिदेवांनी धर्माचरणाचे महत्त्व विषद केले !

‘दत्त’ चरित्रामध्ये आपण वाचले असेल की, सती अनसूयेची सत्त्वपरीक्षा पहाण्यासाठी त्रिदेवांनी तिला दिगंबर अवस्थेत भिक्षा वाढण्यास सांगितले. तेव्हा तिच्यातील सतीत्वामुळे त्रिदेवांचे रूपांतर ३ बालकांमध्ये झाले. या प्रसंगातून भगवंत आपल्याला काय शिकवतो ? तर धर्माचरणात किती सामर्थ्य आहे, हे आपण सामान्यांनी लक्षात घ्यावे.

लेखात वर उल्लेखलेले जे काही प्रसंग आपल्या इतिहासात घडून गेले आहेत, ते आपल्याला धर्माचरणाचे आणि साधनेचे सामर्थ्य स्पष्टपणे समजावून सांगतात.

५. धर्माचरणामुळे रक्षण कसे होते ?

आता एखाद्याला प्रश्न पडेल की, ही प्रक्रिया होते कशी ? तर जेव्हा आपण धर्माचरण करतो, तेव्हा आपल्यातील सत्त्वगुण वाढतो. त्या सत्त्वगुणाचे सुरक्षावलय आपल्याभोवती सिद्ध होते. जे आसुरी वृत्तीचे लोक असतात, ते रज-तमप्रधान वृत्तीचे असतात. आज रज-तमाचा प्रभाव अधिक असल्यामुळे हे लोक आपल्यावर वर्चस्व गाजवत आहेत; परंतु जेव्हा धर्माचरणातून आपली सात्त्विकता वाढेल, तेव्हा रज-तमाचा प्रभाव न्यून होईल. आपल्या सत्त्वगुणाच्या प्रभावामुळे रज-तमप्रधान लोक आपल्यावर वरचढ ठरणार नाहीत.

६. धर्माचरण केल्यामुळे ईश्वराचा आशीर्वाद मिळून तो रक्षण करतोच !

वरील प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते की, आपल्या भक्तासाठी भगवंत स्वतः धावून येतो. आताच्या कलियुगामध्ये कदाचित आपली तितकी श्रद्धा नसेल, त्यामुळे भगवंत स्वतःच्या साहाय्याला धावून आला, तरी आपल्याला कळणार नाही; परंतु कुठल्या तरी मानवाच्या वा पशूच्या रूपात तो येऊन साहाय्य करून जाईल, याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. याचे अनेक दाखले आपल्याला आजही वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये काही जैन साध्वी जात असतांना त्यांच्यावर एका धर्मांधाने आक्रमण केले. त्या वेळी एका व्यक्तीने येऊन त्यांना वाचवले. या प्रसंगात त्या व्यक्तीच्या रूपातून भगवंतच साध्वींच्या साहाय्याला धावून आला, हे लक्षात घ्यायला हवे. येथे वानगीदाखल सनातनच्या दोन साधिकांची उदाहरणे देत आहे.

एकदा एका साधिकेची बसगाडी चुकल्याने ती बसस्थानकावर दुसर्‍या गाडीची वाट पहात होती. रात्री उशिराची वेळ होती. बसस्थानकावरील गर्दीही ओसरली होती. त्या वेळी काही गुंड प्रवृत्तीचे लोक साधिकेकडे येऊ लागले. साधिका थोडा वेळ घाबरली; परंतु नंतर तिला आठवले की, तिला एका संतांनी प्रसाद म्हणून चॉकलेट दिले होते. तिने ते चॉकलेट खाल्ले होते; परंतु त्याचे वेष्टन तिच्या पर्समध्ये होते. तिने ते चॉकलेटचे वेष्टन हातात धरून देवाचा धावा चालू केला. कोण जाणे काय झाले; परंतु थोड्या वेळाने ते गुंड प्रवृत्तीचे लोक माघारी फिरले आणि निघून गेले. वरकरणी आपल्याला हा प्रसंग विचित्र आणि गमतीदार वाटतो; परंतु ‘त्या साधिकेच्या श्रद्धेमुळे भगवंताने तिचे रक्षण केले’, हा भाग आपण समजून घेतला पाहिजे.

अन्य एका प्रसंगांमध्ये दोन साधिका बसने प्रवास करत होत्या. त्या गाडीमध्ये काही टवाळखोर मुले गाडीतील अन्य तरुण मुलींची छेड काढत होते. त्याच गाडीमध्ये बसलेल्या साधिकांना मात्र टवाळखोर मुले काहीच म्हणत नव्हते. गाडी गावात पोचल्यानंतर छेड काढणार्‍या मुलांच्या अन्य मित्राने त्या मुलांना विचारले, ‘‘तुम्ही त्या दोन मुलींना का चिडवले नाही ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘त्या दोन मुलींच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या होत्या. कपाळावर कुंकू होते. त्यामुळे त्यांना चिडवण्याची इच्छाच झाली नाही.’’ येथे साधिका धर्माचरण करत असल्याने देवाने त्यांचे रक्षण केले, हे यातून लक्षात येते.

७. धर्माचरण कसे हवे ?

कुंकू लावण्याचे महत्त्व

येथे आमच्या एखाद्या बुद्धिजीवी भगिनींना वाटेल, ‘केवळ कुंकू लावणे, बांगड्या घालणे म्हणजे धर्माचरण आहे का ? आम्ही आधुनिक रहातो, म्हणजे धर्माचरण करत नाही का ?’, तर असे नाही. धर्माचरण हा दिखावा नाही; परंतु कुंकू लावणे, बांगड्या घालणे, हा धर्माचरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचा लाभ होतो, हे अनेकांनी अनुभवले आहे.

आपण जे धर्माचरण करू ते वरवरचे करून उपयोगाचे नाही, तर त्यासाठी आपल्याला मनापासून प्रयत्न करायला हवेत, तरच ईश्वरी सामर्थ्य आपल्या पाठीशी उभे राहील. आपण केवळ दिखाऊपणा केला, तर धर्माचे बळ आपल्याला मिळणार नाही. जेव्हा इलेक्ट्रिकचे सर्किट पूर्ण होते, तेव्हाच दिवा लागतो किंवा एखाद्या बॅटरीमध्ये सर्व रसायनांचा संयोग झाल्यानंतरच त्यातून ऊर्जेची निर्मिती होते. येथे त्या रासायनिक पदार्थांमध्ये भेसळ असेल, तर ऊर्जा निर्मिती होणार नाही किंवा झाली, तरी ती अल्प स्वल्प प्रमाणात होईल, हे लक्षात घेऊन आपले धर्माचरण शुद्ध, निर्भेळ, प्रामाणिक आणि मनापासून असायला हवे.

८. धर्माचरणातून शौर्य निर्माण होईल !

धर्माचरणातून सात्त्विकतेचे बळ वाढल्याने आपल्यामध्ये एक प्रकारचा करारीपणा येतो, भय दूर जाते. ‘आपण अबला नसून सशक्त आहोत’, याची जाणीव मनाला होते. स्वतःचे आत्मबल वाढते. या सर्वांच्या जोडीला धर्माचरणाचाच एक भाग म्हणून स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे काही प्रकार शिकून घेतल्यास कुठल्याही वाईट प्रवृत्तीच्या माणसाला आपल्याकडे त्या दृष्टीने पहाता येणार नाही हे निश्चित !

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके. (३.६.२०२४)