Hezbollah Commander Killed : इस्रायलचे लेबनॉनवर हवाई आक्रमण : हिजबुल्लाचा कमांडर ठार

इस्रायलवर आक्रमण करण्‍यास उत्तरदायी असलेल्‍या आतंकवाद्याला ठार मारून सूड उगवला

हिजबुल्लाचा कमांडर हज मोहसीन उर्फ फुआद शुक्र (चौकटीत)

तेल अविव – इस्रायलने ३० जुलै या दिवशी लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई आक्रमण केले. या आक्रमणात ३ जण ठार झाले असून ७४ जण घायाळ झाले आहेत. यामध्‍ये हिजबुल्ला या इराणसमर्थक आतंकवादी संघटनेचा कमांडर हज मोहसीन उर्फ फुआद शुक्र ठार झाल्‍याचा दावा इस्रायली सैन्‍यदलाने केला आहे.

१. इस्रायली सैन्‍यदलाने दावा केला की, त्‍याच्‍या लढाऊ विमानांनी ३० जुलैला बैरूत भागात हिजबुल्लाचा कमांडर फुआद याला ठार केले. इस्रायलमधील गोलान हाइट्‍सवरील आक्रमणासाठी तोच उत्तरदायी असल्‍याचा दावा इस्रायलने केला होता.

२. यापूर्वी २७ जुलैला हिजबुल्लाने इस्रायलवर गेल्‍या १० महिन्‍यांतील सर्वांत मोठे आक्रमण केले होते. गोलान हाइट्‍सच्‍या फुटबॉल मैदानात त्‍याने रॉकेट डागले होते. यामध्‍ये १२ जणांचा मृत्‍यू झाला होता, तर सुमारे ३० जण घायाळ झाले होते. त्‍याला प्रत्‍युत्तर म्‍हणून इस्रायली सैन्‍यदलाने हे हवाई आक्रण केले.

३. इस्रायली सैन्‍यदलाचे प्रवक्‍ते डॅनियल हगारी म्‍हणाले की, फुटबॉल मैदानावरील आक्रमण आणि इतर अनेक इस्रायली नागरिकांच्‍या हत्‍या यांना फुआद उत्तरदायी होता.  फुआद हा हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाह याचा उजवा हात होता, असे हगारी यांनी सांगितले.

४. इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी सांगितले की, फुआद याने अनेक इस्रायलींची हत्‍या केली होती. याचा सूड आम्‍ही घेतला. इस्रायलचे सैनिक जगाच्‍या कोणत्‍याही कानाकोपर्‍यातून इस्रायलींच्‍या खुन्‍यांना शोधून ठार मारतील.

५. फुआदला अमेरिकेने वर्ष २०१९ मध्‍ये आंतरराष्‍ट्रीय आतंकवादी घोषित केले होते. त्‍याच्‍याविषयी माहिती देण्‍यार्‍याला अमेरिकेने ५० लाख डॉलर्स (सुमारे ४२ कोटी रुपये)  बक्षीस देऊ केले होते.

संपादकीय भूमिका

इस्रायलवर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना तात्‍काळ ठार मारून इस्रायल सूड उगवतो. आतंकवादग्रस्‍त भारत यातून काही बोध घेईल का ?