विदेशी नागरिकांसाठी महाराष्ट्रात स्थानबद्ध केंद्रे उभारण्यात येणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – व्हिसाची मुदत संपलेले, कारागृहातून शिक्षा भोगून सुटलेले किंवा विविध कारणास्तव त्यांच्या देशात परत न गेलेले विदेशी नागरिक यांना स्थानबद्ध करण्यासाठी राज्यात स्थानबद्ध केंद्र उभारण्यात येणार आहेत. यासाठी सध्या भोईवाडा मध्यवर्ती कारागृह येथे ८० जणांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे, तर नवी मुंबई येथील बाळेगाव येथे २१३ जणांसाठी कायमस्वरूपाचे स्थानबद्ध केंद्र उभारण्यात येणार आहे.

या केंद्रांच्या प्रशासकीय कामकाजासाठी शासनाकडून ४ कोटी ८ सहस्र रुपये इतका वार्षिक निधी संमत करण्यात आला आहे. भारतात विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील देशांमधून आलेले नागरिक पारपत्राची मुदत संपल्यावर भूमीगत होतात. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मोहीम हाती घ्यावी लागते; मात्र त्यांना पकडल्यावर विदेशात पाठवेपर्यंत रहाण्याची व्यवस्था नसल्यामुळे अडचण येत होती. विदेशी नागरिकांच्या स्थानबद्धतेची अडचण मागील अनेक वर्षांपासून पोलिसांपुढे होती. यासाठी स्थानबद्ध केंद्राची उभारणी झाल्यावर राज्यात अवैध रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर कारवाई करणेही सोयीचे ठरणार आहे.