संपादकीय : संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर’ भारत !

आयर्न डोम

गेल्या १० वर्षांपासून भारत संरक्षण क्षेत्रात एकेक पाऊल यशस्वीरित्या पुढे टाकत आहे. भारताने कोणत्याही युद्धात हवाई आक्रमणापासून सुरक्षा देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी ‘आयर्न डोम’ ही विशेष यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेद्वारे शत्रूकडून येणारे कोणत्याही प्रकारचे क्षेपणास्त्र, ड्रोन हे हवेतच नष्ट केले जातात. भारत सरकारच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) ओडिशा येथील बालासोर जिल्ह्यातील एका बेटावरून या प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली. इस्रायल सध्या वापरत असलेल्या ‘आयर्न डोम’ या यंत्रणेमुळेच हमासच्या आक्रमणात इस्रायलची मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टळली. त्यामुळे भारतानेही यात स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेत ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ला अशा प्रकारची यंत्रणा विकसित करण्यास सांगितले. भारताच्या या सुरक्षायंत्रणेचे वैशिष्ट्य म्हणजे ही यंत्रणा ‘स्टिल्थ फायटर विमान’, ‘विमान’, ‘ड्रोन’, ‘क्रूझ क्षेपणास्त्र’ आणि इतर कोणत्याही हवेतील आक्रमणापासून समर्थपणे तोंड देण्यासाठी सिद्ध आहे. याच समवेत भारताने अन्य एका दुसर्‍या संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केली. या ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीद्वारे ५ सहस्र किलोमीटर पल्ल्यावरील शत्रूच्या क्षेपणास्त्रांपासून रक्षण करणे शक्य होणार आहे. या दोन्ही प्रणालींचा विकास, म्हणजे संरक्षण क्षेत्रात भारत ‘आत्मनिर्भर’ होत असल्याचाच एक भाग आहे.

इस्रायलकडून ‘आयर्न डोम’चा प्रभावी वापर !

इस्रायलकडून ‘आयर्न डोम’चा प्रभावी वापर

चारही बाजूंनी घेरलेल्या अनेक इस्लामी राष्ट्रांपासून संरक्षण होण्यासाठी इस्रायलने ही यंत्रणा पुष्कळ अगोदरच विकसित केली आहे. अनेक वेळा पॅलेस्टाईनकडून सोडण्यात येणारी अनेक क्षेपणास्त्रे या यंत्रणेने हवेतच नष्ट केली होती. १५ एप्रिलला इराणने इस्रायलवर सोडलेल्या ३०० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रांपैकी ९९ टक्के क्षेपणास्त्रे इस्रायलच्या भूमीवर आदळण्यापूर्वीच नष्ट करण्यात आली. त्यामुळे इस्रायलची अगदी अल्प प्रमाणात हानी झाली. ‘हमास’ आणि ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनांकडून छोट्या आकाराची रॉकेट्स नेहमी इस्रायलवर सोडली जातात. त्यांच्या विरोधात ‘आयर्न डोम’ चांगल्या प्रकारे रक्षण करते. संपूर्ण इस्रायलमध्ये या यंत्रणेच्या अंतर्गत छोटी क्षेपणास्त्र केंद्रे विखुरलेली आहेत. प्रत्येक केंद्राकडे ३-४ ‘लाँचर’ असतात, ज्यातून २० क्षेपणास्त्रवेधी क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात.

‘आयर्न डोम’ कसे काम करते ?

आयर्न डोम

या यंत्रणेत ४ यंत्रणा एकत्र काम करतात. शत्रूकडून क्षेपणास्त्र डागले गेल्यानंतर रडार यंत्रणा उपग्रहातील माहितीच्या आधारे येणार्‍या क्षेपणास्त्राचा मार्ग निर्धारित करते आणि आवश्यक वाटल्यास क्षेपणास्त्र सोडून हवेतच शत्रूच्या क्षेपणास्त्राला नष्ट केले जाते. या संपूर्ण यंत्रणेला ‘आयर्न डोम’, असे नाव देण्यात आले आहे. या यंत्रणेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या क्षेपणास्त्रामध्ये अशी एक यंत्रणा आहे की, जर क्षेपणास्त्राने थेट शत्रूच्या क्षेपणास्त्राला धडक दिली नाही, तर ती शत्रूच्या क्षेपणास्त्राच्या जवळच १० मीटर अंतरावर फुटते. त्यामुळे शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट होते. वर्ष २०२२ मध्ये भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने या प्रणालीच्या विकासाला अनुमती दिली होती. त्यासाठी २१ सहस्र ७०० कोटी रुपयांचे प्रावधानही करण्यात आले. भारताच्या या संरक्षण प्रणालीमध्ये लांब पल्ल्यांपर्यंत लक्ष ठेवणे, ‘फायर कंट्रोल रडार’ आणि शत्रूची क्षेपणास्त्रे, तसेच कोणत्याही प्रकारचे हवाई आक्रमण करणार्‍या उपकरणांना पाडणारी ‘इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रे असणार आहेत.

आयर्न डोम प्रणालीचा विकास आणि त्यात स्वयंपूर्ण होणे आवश्यक !

गेली काही वर्षे पाहिल्यास चीन हा नेहमीच भारताच्या विरोधात सातत्याने कारस्थाने करतांना आढळतो. पहिली आणि दुसरी महायुद्धे ही त्या त्या राष्ट्रांच्या भूमीवर लढली गेली. आता मात्र येणार्‍या काळात अशी क्षेपणास्त्रे विकसित झाली आहेत की, ती थेट एका खंडातून दुसर्‍या खंडात जाऊ शकतील. त्यामुळे कुठलाही देश त्यांच्याच देशातून दुसर्‍या देशावर क्षेपणास्त्र सोडेल. त्यामुळे ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ही सध्याच्या काळातील अत्यंत महत्त्वाची प्रणाली असून कोणत्याही देशाने त्यांच्या देशातून सोडलेले क्षेपणास्त्र निष्प्रभ करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध असो, इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध असो किंवा रशिया-अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध असो, जागतिक भविष्यकालीन स्थितीत कधीही तिसर्‍या महायुद्धाला प्रारंभ होऊ शकतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत चीन आणि पाकिस्तान यांसारख्या कावेबाज शत्रूराष्ट्रांना प्रत्युत्तर देण्याची भारताची सिद्धता ही नेहमीच हवी ! त्यामुळे अशा प्रणालींचा विकास आणि त्यात स्वयंपूर्ण होणे, हे सध्याच्या काळात अत्यावश्यक आहे.

इस्रालय समवेतच्या युद्धात हुती, येमेन बंडखोरांनी त्यांच्याकडे असलेली छोटी रॉकेट्स, क्षेपणास्त्रे त्यांनी इस्रालयवर डागली. अगदी इराणने १ सहस्र ८०० किलोमीटरवरून इस्रालयवर क्षेपणास्त्रे डागली. अशाच प्रकारचा धोका भारताला पाककडून सातत्याने असतो. पाकपुरस्कृत ‘लष्कर ए तोयबा’सारख्या अनेक संघटनांकडेही अशी क्षेपणास्त्रे, रॉकेट नजीकच्या काळात उपलब्ध झाल्यास आणि ती चीन-पाकिस्तानच्या सीमाभागातून डागली गेल्यास भारताला स्वत:चे रक्षण करण्यासाठी अशा यंत्रणेची निश्चित आवश्यकता आहे.

सध्याच्या युद्धजन्य स्थितीत जर आपल्याकडे स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली असेल, तरच ते आपल्याला साहाय्यभूत होते. त्यामुळे पंतप्रधानांनी एका भाषणात सांगितल्याप्रमाणे गेल्या काही वर्षांत भारताने देशातच संरक्षणविषयक उपकरण निर्मितीसाठी संशोधन, संरचना आणि उत्पादन तंत्रज्ञानाचा विकास, यासाठी एक गतीमान व्यवस्था विकसित करण्याचा सविस्तर आराखडा मांडला आहे. जेव्हा आपण बाहेरच्या देशांमधून शस्त्रास्त्रे, उपकरणे मागवतो, तेव्हा त्याची प्रक्रिया वेळखाऊ असते आणि ती सुरक्षा दलापर्यंत पोचेपर्यंत कालबाह्य होतात. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेचे महत्त्व ओळखून मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. जेव्हा आपल्या सैन्याकडे भारतात निर्माण केलेली उपकरणे असतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा अभिमान आणखी वाढतो.

संपादकीय भूमिका :

संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारताने संरक्षणासाठी सर्व सीमांवर ‘आयर्न डोम’सारखी प्रणाली तैनात करणे आवश्यक !