New Railway Ticket Booking Rule : रेल्‍वेचे ‘वेटिंग’ तिकीट असलेल्‍या प्रवाशांना यापुढे आरक्षित डब्‍यातून प्रवास करता येणार नाही !

  • नियम मोडल्‍यास होणार ४४० रुपयांचा दंड

  • ‘वेटिंग’ तिकीटच्‍या संदर्भातील नियमात पालट

नवी देहली – रेल्‍वे मंडळाने ‘वेटिंग’ तिकीटच्‍या संदर्भातील नियमात पालट केला असून आता नव्‍या नियमानुसार ‘वेटिंग’ तिकीट असलेल्‍या प्रवाशांना यापुढे आरक्षित डब्‍यातून (ज्‍या डब्‍यातील सर्व प्रवाशांनी आरक्षण केले आहे, त्‍यातून) प्रवास करता येणार नाही. यापुढे जर ‘वेटिंग’ तिकीट असलेला प्रवासी आरक्षित डब्‍यातून प्रवास करतांना आढळला, तर त्‍याला ४४० रुपयांचा दंड आकारण्‍यात येणार आहे. १ जुलैपासून हा नियम लागू झाला असून तिकीट तपासनीसांना या नियमाच्‍या काटेकोर कार्यवाहीचा (अंमलबजावणीचा) आदेश देण्‍यात आला आहे.

सहस्रो प्रवाशांनी केलेल्‍या तक्रारीनंतर रेल्‍वे प्रशासनाला जाग !

‘वेटिंग’ तिकीट घेऊन प्रवासी आरक्षित डब्‍यात चढत असल्‍याने आरक्षित डब्‍यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. याविषयी सहस्रो प्रवाशांनी रेल्‍वे प्रशासनाकडे तक्रारी केल्‍या होत्‍या. त्‍यामुळे आरक्षित डब्‍यातील गर्दी अल्‍प करण्‍यासाठी आणि आरक्षित डब्‍यांमध्‍ये ‘कन्‍फर्म’ तिकीट घेऊन प्रवास करणार्‍यांच्‍या सोयीसाठी रेल्‍वे प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे.

ऑफलाईन पद्धतीने तिकीट काढणार्‍या प्रवाशांनाही नियम लागू !

प्रवाशांनी ऑफलाईन पद्धतीने, म्‍हणजेच रेल्‍वेच्‍या तिकीट खिडकीवरून तिकीट जरी काढले असेल, तरी त्‍यांना आरक्षित डब्‍यात प्रवास करता येणार नाही. यापूर्वी प्रवासी ऑफलाईन पद्धतीने तिकीट काढून आरक्षित डब्‍यातून प्रवास करत होते.

रेल्‍वे अधिकार्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार ब्रिटीश काळापासूनच ‘वेटिंग’ तिकीटावर प्रवास करण्‍यावर बंदी आहे; परंतु त्‍याचे काटेकोरपणे पालन केले गेले नाही. रेल्‍वेचा स्‍पष्‍ट नियम आहे की, जर प्रवशांनी तिकीट खिडकीवरून तिकीट घेतले असेल आणि ते ‘वेटिंग’वर असेल, तर गाडी सुटण्‍याच्‍या वेळेपर्यंत ते ‘कर्न्‍फम’ झाले नाही, तर प्रवासी ते ‘वेटिंग’ तिकीट रहित करून पैसे परत मिळवू शकतात; मात्र असे करण्‍याऐवजी प्रवासी ‘वेटिंग तिकीटावरच आरक्षित डब्‍यात चढून सर्रास प्रवास करतात. हे रोखणे आवश्‍यक आहे.

नियम मोडणार्‍या प्रवाशांना तिकीट तपासनीस गाडीतून उतरवू शकतात !

रेल्‍वे प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार वरील नियम मोडणार्‍या प्रवाशांना ४४० रुपयांचा दंड आकारण्‍यासह त्‍यांना रेल्‍वेच्‍या खाली उतरवले जाऊ शकते. याखेरीज अशा प्रवाशांना सामान्‍य डब्‍यात (अनारक्षित किंवा जनरल डब्‍यात) पाठवण्‍याचा अधिकारही तिकीट तपासनीसाला असणार आहे.