सेवेची तीव्र तळमळ आणि तत्त्वनिष्ठ असलेल्या पुणे येथील सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक (वय ४२ वर्षे) !

पुणे येथील साधकांना पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत. (भाग १)

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. सौ. जानकी युवराज पवळे, चंदननगर, पुणे

१ अ. ‘साधकांनी आध्यात्मिक स्तरावर दिवाळी साजरी करावी’ आणि ‘त्यांची साधनेत प्रगती व्हावी’, यांसाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पू. (सौ.) मनीषा पाठक ! : ‘पू. मनीषाताईंना चालायला पुष्कळ त्रास होतो. असे असूनही ‘जिल्ह्यातील सर्व साधकांची ही दिवाळी (वर्ष २०२३ ची) आध्यात्मिक स्तरावर साजरी व्हावी’ आणि ‘साधकांचे साधनेचे प्रयत्न शीघ्र गतीने व्हावेत’, यासाठी त्यांनी ‘मेट्रो’ आणि रिक्शा यांतून प्रवास करून पुणे जिल्ह्यातील साधकांच्या भेटी घेतल्या. एक दिवस मला त्यांच्या समवेत जाण्याची संधी मिळली. मी त्यांनी सांगितलेल्या ‘मेट्रो’ स्थानकावर गेले. तेव्हा त्या एका हातात एक जड पिशवी घेऊन ‘वॉकर’ घेऊन चालत येत होत्या. त्यांच्या जवळ जाऊन ती पिशवी घेऊन मी त्यांना विचारले, ‘‘या पिशवीत एवढे जड काय आहे ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘साधकांसाठी खाऊ आहे.’’ ते ऐकून त्यांच्या मनात साधकांप्रती असलेली प्रीती आणि साधकांच्या साधनेसाठी असलेली तळमळ पाहून मला भरून आले. वेळेअभावी त्यांना ज्या गावांत जाणे शक्य झाले नाही, त्या गावांतील साधकांना त्यांनी ‘ऑनलाईन’ सत्संगाद्वारे संपर्क केला. हे पाहून मला पू. मनीषाताई, म्हणजे साक्षात् ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्वरूपच आहेत’, असे अनुभवता आले.’

२. सौ. रिमा नान्नीकर, हडपसर, पुणे.

२ अ. ‘साधकांना सत्संगातील सूत्रांचा भावाच्या स्तरावर लाभ व्हावा’, यासाठी धडपडणार्‍या पू. (सौ.) मनीषा पाठक !

२ अ १. पू. मनीषा पाठक यांच्या भ्रमणभाषला तांत्रिक अडचण येणे आणि ती सुटण्यासाठी २ – ३ साधकांना रात्री २ वाजेपर्यंत प्रयत्न करावा लागणे : ‘एकदा पुणे जिल्ह्यातील साधकांसाठी पू. मनीषाताईंनी ‘ऑनलाईन’ सत्संगाचे नियोजन केले होते. त्याच्या आदल्या रात्री पू. मनीषाताईंच्या भ्रमणभाषला तांत्रिक अडचण आली. ती अडचण सुटण्यासाठी त्यांनी त्यांचे यजमान श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचे साहाय्य घेतले. त्यांना ती अडचण सुटली नाही; म्हणून त्यांनी रात्री दीड वाजता एका साधकाचे साहाय्य मागितले; पण त्यालाही अडचण सोडवता आली नाही. तेव्हा त्यांनी दुसर्‍या एका साधकाला ‘‘साहाय्य करू शकता का ?’’, असे विचारले. रात्री २ वाजता त्या साधकांनी अडचण सोडवली. अडचण सुटल्यावर पू. मनीषाताईंना पुष्कळ आनंद होऊन अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे साधक आणि गुरुदेव यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२ अ २. साधकांना सत्संगातील सूत्रांचा भावाच्या स्तरावर लाभ होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : दुसर्‍या दिवशी सत्संगात पू. मनीषाताईंनी श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी भावार्चना केली आणि या सोहळ्याचा भावाच्या स्तरावर लाभ होण्यासाठी ‘साधकांनी कसे प्रयत्न करायचे ?’, ते सांगितले. नंतर त्यांनी सत्संगात त्यांच्या भ्रमणभाषला आलेल्या अडचणीविषयीही सांगितले. यातून ‘साधकांना साधनेची सूत्रे समजावी’ आणि ‘त्यांचे साधनेचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी त्यांची किती तळमळ आहे ?’, ते माझ्या लक्षात आले अन् ‘माझी साधनेची तळमळ, धडपड, प्रयत्न किती अल्प आहेत ?’, याचीही मला जाणीव झाली.’

३. सौ. प्रीती कुलकर्णी, कोथरूड, पुणे.

३ अ. उद्वाहन नादुरुस्त असल्याने चालण्याचा त्रास होत असतांनाही ६ माळे वर चढून जाऊन सेवा पूर्ण करणे : ‘२०.२.२०२४ या दिवशी जिल्ह्यातील वस्तूसाठा पाहून त्याची विभागणी करायची सेवा होती. त्या सेवेसाठी मी पू. मनीषाताईंच्या समवेत गेले होते. तिथे गेल्यावर ‘उद्वाहन नादुरुस्त आहे’, हे आमच्या लक्षात आले. ‘आज इथल्या सेवेचे नियोजन केले आहे. ते पूर्ण करायला हवे’, असे म्हणून चढायला त्रास होत असूनही त्या ६ माळे चढून वर गेल्या आणि पुढे सलग ६ घंटे सेवा केली. यातून त्यांना असलेला ‘गुरुसेवेचा ध्यास, त्यासाठी कुठलीही अडचण आली, तरी गुरुदेवांना शरण जाऊन त्यावर मात करणे’, या त्यांच्यातील दिव्य गुणांची मला प्रचीती आली.

३ आ. ‘संतांचा प्रश्न, इच्छा आणि आज्ञा एकच असते’, हे देवाने लक्षात आणून देणे : ‘एका साधिकेचे निधन झाल्यावर त्यांच्या अंत्यविधीच्या सिद्धतेसाठी काही साधकांची आवश्यकता होती. तेव्हा पू. मनीषाताई स्वतः स्मशानभूमीकडे गेल्या आणि तिथून त्यांनी मला संपर्क करून ‘सेवेसाठी येतेस का ?’, असे विचारले. तेव्हा मी एका सत्संगात होते. देवाने मला ‘आज्ञापालन कर’, असा विचार दिला; म्हणून मी तत्परतेने तिकडे सेवेला गेले.’ तेव्हा ‘संतांचे प्रश्न, इच्छा आणि आज्ञा एकच असते’, याची देवाने मला जाणीव करून दिली अन् ‘संतांनी सांगितल्यावर तीच सेवा प्राधान्याने आणि तत्परतेने करायला हवी’, हे शिकता आले.’

४. सुश्री उज्ज्वला ढवळे, तानाजीनगर, पुणे.

४ अ. अल्प अहं आणि नियोजनात सहजतेने पालट स्वीकारणार्‍या पू. (सौ.) मनीषा पाठक !

४ अ १. अहं अल्प असल्यामुळे सहजतेने चुका विचारून घेणार्‍या पू. (सौ.) मनीषा पाठक ! : ‘पुणे येथे सत्संगसेवक आणि सत्संगात सहभागी होणारे जिज्ञासू यांचे एक एकत्रित शिबिर होते. शिबिराच्या उद्घाटनाच्या सत्रात बोलतांना पू. मनीषाताईंनी काही सूत्रे सांगितली. नंतर त्यांनी मला विचारले, ‘‘मी सांगत असलेली सूत्रे लक्षात येतात ना ? कि मी काही पालट करायला हवा ?’’ अहं अल्प असल्यामुळे त्या संत असूनही सहजतेने इतरांना स्वतःच्या चुका विचारून घेतात.

४ अ २. सतर्कता आणि आवश्यक तिथे पालट करणे : त्या शिबिरात आरंभी शिबिराचा उद्देश सांगितल्यावर ‘उपस्थित सर्व जिज्ञासूंची ओळख करून घ्यायला हवी’, हे सूत्र त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तत्परतेने तो पालट करून सर्वांची ओळख करून घेतली. यातून त्यांच्यातील ‘सतर्कता आणि आवश्यक तिथे पालट करणे’, हे गुण मला शिकता आले.’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक २५.२.२०२४) (क्रमशः)