परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मी अनुभवलेले द्रष्टेपण !

वर्ष १९९० ते १९९५ या कालावधीत मी सेवेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील घरी रहात होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची गुरुभक्ती आणि साधकांवरील मातृ-पितृवत् प्रीती ही सूत्रे आपण १ जून या दिवशी पाहिली. आज मी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/798957.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. साधकांच्या आयुष्यात पुढे घडणार्‍या गोष्टी सहजतेने सांगणे

अ. मी भांडुपला एक खोली विकत घेतली होती; पण नंतर मी ती खोली विकणार होतो. त्याविषयी मी गुरुदेवांना विचारले. ते मला म्हणाले, ‘‘खोलीचे तू खर्च केलेल्यांपैकी ३० टक्के एवढेच पैसे तुला मिळतील.’’ तसेच झाले.

आ. आम्हा साधकांना ‘पत्नी कशी मिळणार ?’, याचे वर्णनही त्यांनी आम्हाला आधीच सांगितले होते आणि पुढे तसेच घडले.

श्री. विष्णु कदम

२. ‘भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना भारत जिंकणार असून तो पहाण्यासाठी वेळ वाया न घालवता शेवटची १० षटके पहा’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

एकदा भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ५० षटकांचा क्रिकेटचा सामना चालू होता. आम्ही तो पहात होतो. गुरुदेव तिथे आल्यावर आम्ही सर्व जण उठून उभे राहिलो. ते आम्हाला म्हणाले, ‘‘पाकिस्तानच्या २२५ धावा होतील; पण सामना भारत जिंकेल; म्हणून आता वेळ वाया न घालवता केवळ शेवटची १० षटके बघा.’’ नंतर तसेच घडले.

३. ‘पावसामुळे गुरुसेवेत खंड पडू नये’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘४ घंटे पाऊस पडणार नाही’, असे सांगितल्यावर पाऊस न येणे, त्यातून त्यांचे पंचमहाभूतांवरील प्रभुत्व लक्षात येणे

वर्ष १९९५ मध्ये इंदूर येथे प.पू. बाबांचा अमृतमहोत्सव होणार होता. त्यासाठी श्री. रोहन भोजने (आताचे कै. रोहन भोजने) आणि श्री. सदानंद पांचाळ हे अन्य साधकांसह डफलीच्या आकाराचे मोठे प्रवेशद्वार सिद्ध करण्याची सेवा करत होते. मुंबई सेवाकेंद्राच्या आगाशीवर ही सेवा केली जात असे. श्री. भोजने यांना रविवारी सुटी असल्यामुळे ते त्या दिवशी अधिक सेवा करायचे; पण पावसाचे दिवस असल्यामुळे एकदा सकाळीच पाऊस पडू लागला. तेव्हा त्यांना ‘आता सेवा कशी करायची ?’, असा प्रश्न पडला. त्यांनी गुरुदेवांना याविषयी विचारले. तेव्हा गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला सेवा करायला किती घंटे लागणार ?’’ रोहन भोजने म्हणाले, ‘‘४ घंटे लागतील.’’ यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘४ घंटे पाऊस पडणार नाही. आपण त्याला सांगूया.’’ आश्चर्य म्हणजे पाऊस थांबला आणि ४ घंटे पाऊस पडला नाही. तेव्हा आम्ही सर्वांनी मनोमन हात जोडून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

– श्री. विष्णु कदम (वय ६४ वर्षे), आरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. (१५.२.२०२४)

(समाप्त)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक