Operation Blue Star : अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

अमृतसर (पंजाब) – येथील सुवर्ण मंदिरात ६ जून १९८४ मध्ये भारतीय सैन्याकडून खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ नावाने कारवाई करण्यात आली होती. या दिनाच्या निमित्ताने सुवर्ण मंदिरात मोठ्या संख्येने खलिस्तान समर्थक एकत्र आले.

त्यांनी हातात तलवारी घेत ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, तसेच त्यांच्या हातात या कारवाईत ठार झालेला खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे छायाचित्र होते.

या वेळी अटकेत असलेला आणि लोकसभा निवडणुकीत विजय झालेला अमृतपाल सिंह याची आई उपस्थित होती. इंदिरा गांधी यांची हत्या करणारा त्यांचा सुरक्षारक्षक बेअंत सिंह याचा मुलगा सरबजीत सिंह खालसा हाही या निवडणुकीत फरीदकोट येथून विजयी झाला, तोही या वेळी उपस्थित होता. अमृतपाल हा देशद्रोहाच्या खटल्यात आसाममधील दिब्रुगड कारागृहात आहे.